Pimple Gurav News : पथनाट्य हे लोकचळवळीचे प्रभावी माध्यम – माधव राजगुरू

एमपीसी न्यूज – ‘पथनाट्य हे लोकचळवळीचे प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अभिजन वर्गाबरोबरच जनसामान्यांपर्यंत हे अभियान पोहचावे यासाठी पथनाट्य अतिशय उत्तम साधन आहे’, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि अक्षरभारती या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले.

मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंच आणि अक्षरभारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे-गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे गुरुवारी (दि. 25)  ‘माय मराठी’ या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रा. धनंजय भिसे, आम्ही सावित्रीच्या लेकी मंचाच्या अध्यक्ष रविना आंगोळकर, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, सविता इंगळे, डॉ. पी.एस. आगरवाल, आय.के. शेख, तानाजी एकोंडे, अक्षरभारतीचे कार्याध्यक्ष श्रीकांत चौगुले, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक हे उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या आशयाचे ‘माय मराठी’ पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रकाश घोरपडे (संत तुकाराम), विजया नागटिळक (सावित्रीची लेक), सुभाष चव्हाण (शिक्षक), नंदकुमार कांबळे (गावातील पुढारी), अण्णा जोगदंड (मराठी भाषा प्रचारक), निशिकांत गुमास्ते (साहित्यप्रेमी), शरद शेजवळ आणि शामराव सरकाळे (शेतकरी ग्रामस्थ) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

_MPC_DIR_MPU_II

पथनाट्यातून मराठीचा इतिहास आणि प्राचीनता, अभिजात भाषेचे निकष पूर्ण करण्याची क्षमता, मराठीतून संवाद आणि शिक्षणाचे माध्यम तसेच दैनंदिन व्यवहार करण्याचे आग्रही प्रतिपादन करीत भविष्यात मराठी भाषेला निश्चित उज्ज्वल काळ आहे, असे अनेक संदेश पथनाट्यातून देण्यात आले.

पथनाट्यानंतर प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी भाषेची समृद्धी कथन केली. श्रीकांत चौगुले यांनी ‘जोपर्यंत ज्ञानोबांच्या ओव्या आणि तुकोबांचे अभंग अस्तित्वात आहेत, तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील’, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थित श्रोत्यांना प्रकाश घोरपडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज लिखित हरिपाठ अभंगांच्या पुस्तिकांचे वितरण केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात मल्लिकार्जुन इंगळे, मीरा कंक, फुलवती जगताप, आनंद मुळूक, उमा माटेगावकर, विलास कुलकर्णी, दैवता घोरपडे, प्रदीप तरडे, जयश्री गुमास्ते, प्रथमेश जगदाळे यांनी सहकार्य केले.

शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. पंकज पाटील यांनी आभार मानले. भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.