Pimple Gurav News : ‘तुलसी विवाह’ तो ही दोन दिवस ! तुळशीचा विधीवत गृहप्रवेश आणि नवरदेवाला गाडीतून निरोप

एमपीसी न्यूज – अर्ध्या तासात उरकणारा तुलसी विवाह दोन दिवस चालला, असे म्हटले तर तुमचा विश्वास बसेल ? पण, हे खरं आहे. पिंपळे गुरव येथे अनंतनगर महिला मंडळ व अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने सामूहिक तुलसी विवाह सोहळा थाटात पार पडला. घरातील मुलीच्या विवाहाप्रमाणे हा विवाह सोहळा दोन दिवस सुरू होता. यात मेंहदी, हळदी, मंगलाष्टका, पाठवणी, गृहप्रवेश आदी परंपरा विधीवत पार पाडण्यात आल्या. परिसरातील आबालवृद्धांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


 

तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा आघात आहे. याच अनुषंगाने अनंतनगरमद्ये तुळशी व विष्णूचे आधुनिक स्वरूपातील मुखवटे तयार करण्यात आले होते. पहिल्या दिवशी जात्यावर हळद दळण्यात आली. तर दुसऱ्या तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची रंगरंगोटी करण्यात आली. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवण्यात आले.

नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातले गेले. तुळशीला नवीन वस्त्र पांघरून त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवण्यात आली. पूजेचे उपचार समर्पण करून दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा मोठ्या थाटामाटात विवाह लावण्यात आला. यानंतर तुळशीचे कन्यादान व मंत्रपुष्प आणि आरती करण्यात आली. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्यात आली होती.

दरम्यान, मुलीच्या विवाहात घरसंसार व आवश्यक वस्तू माहेरच्या मंडळींकडून मुलीला दिल्या जातात. त्याचप्रमाणे या तुळशीलाही या वस्तू कन्यादान वेळी देण्यात आल्या होत्या. तसेच नवरदेवाला प्लास्टिकच्या गाडीतून निरोप देण्यात आला. त्यानंतर तुळसीचा विधीवत गृहप्रवेशही करण्यात आला.

मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेली रायगडाची प्रतिकृती प्रकाशमान करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.