PimpleGurav : विधवा महिलांच्या हस्ते वटवृक्षरोपण अन् पूजन

एमपीसी न्यूज – वटपौर्णिमा म्हटली की ठिकठिकाणी सवाष्णी वडाच्या झाडाला फेऱ्या घालीत सात जन्माचे सौभाग्य मागताना दिसतात. परंतु या परंपरेला छेद देत सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेने पाच विधवांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण आणि पूजन करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संदेश देत परिवर्तनाच्या वाटेवर एक ऐतिहासिक पाऊल टाकले.

पिंपळे-गुरव येथील स्मशानभूमीत रविवारी (दि. १६ जून) या आगळ्यावेगळ्या अभिनव कार्यक्रमात शकुंतला ढोबळे, शोभा जोशी, माधुरी ओक, उज्ज्वला केळकर आणि फुलवती जगताप या विधवांच्या हस्ते तीन वटवृक्षांचे रोपण आणि पूजन करण्यात आले.

  • वास्तविक स्वतःचा कोणताही दोष नसताना दुर्दैवाने वैधव्य आल्यावर त्या स्त्रीला समाजात धार्मिक आणि मंगल कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. परंतु या कार्यक्रमात सावित्रीच्या लेकींचा मंचाच्या अध्यक्षा रवीना आंगोळकर, उपाध्यक्षा मधुश्री ओव्हाळ आणि सचिव मीरा कंक यांनी मायेची माहेरची शाल आणि सुरेश कंक लिखित ‘झाड बोलाया लागले’ हे पुस्तक देऊन त्यांना आदरपूर्वक सन्मानित केले.

आपल्या प्रास्ताविकातून मधुश्री ओव्हाळ यांनी, “वटवृक्षाला सात फेरे मारण्यापेक्षाही झाडे लावली आणि जगवली तर निश्चितच आपल्या सात पिढ्या सुखात राहतील!” अशा संयोजनामागील भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीता झिंझुरके यांनी सावित्रीच्या ओव्यांचे सादरीकरण केले.

  • याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, सुरेश कंक, महेंद्रकुमार गायकवाड, प्रदीप गांधलीकर, नंदकुमार कांबळे, बाळासाहेब घस्ते यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केलीत; तर आय.के.शेख, देवेंद्र गावंडे, सुहास घुमरे, कैलास भैरट, निशिकांत गुमास्ते यांनी निसर्ग कवितांचे सादरीकरण केले.

यावेळी प्रदीप बोरसे, दिलीप ओव्हाळ, मुरलीधर दळवी, उमेश सणस यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संयोजनात शैला गायकवाड, स्नेहल आंगोळकर, उज्ज्वला पवार, माधुरी कांबळे, आशा ढोबळे, चैताली चव्हाण, जयश्री गुमास्ते यांनी परिश्रम घेतले. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले. रवीना आंगोळकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.