Pimple gurav : गुलाबी थंडीत रंगले कविसंमेलन

एमपीसी न्युज – “माणसामाणसांतील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि मैत्री वृद्धिंगत करणारे चहा हे पेय भारतीयांसाठी अमृतच आहे!” असे मत ज्येष्ठ कवी प्रदीप गांधलीकर यांनी पिंपळे-गुरव येथे व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या जागतिक चहादिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंचाने ‘मस्त थंडी… वाफाळलेला चहा आणि सोबत कविता’ या आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे पिंपळे-गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळील चहाच्या दुकानाभोवती सकाळी सात वाजता आयोजन केले होते. या कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप गांधलीकर बोलत होते. समरसता साहित्य परिषद (पिंपरी – चिंचवड शाखा) कार्यवाह सुहास घुमरे अध्यक्षस्थानी होते. नगरसेवक सुनील आंगोळकर, नगरसेवक महेश जगताप, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते. सुहास घुमरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “काळ्या मातीचे व्यासपीठ आणि आकाशाचा मांडव हे शब्दधन काव्यमंचाचे वैशिष्ट्य असून इतर कविसंमेलनात कवी शब्दसंपन्न होतो; तर ‘शब्दधन’च्या मंचावर अनुभवसंपन्न होतो!” असे मत व्यक्त केले.सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले; तर श्रीकांत चौगुले यांनी स्वागत केले.

प्रदीप गांधलीकर पुढे म्हणाले की, “इसवी सनपूर्व अस्तित्वात असलेले चहा हे पेय मूळचे चीन मधील असले तरी चहा उत्पादन करणाऱ्या सव्वीस देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. असे असले तरी भारतात असलेल्या प्रचंड गरिबी आणि बेरोजगारीमुळे अनेकांना आपली एक वेळची भूक फक्त चहावर भागवावी लागते!”

गुलाबी थंडीत वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेताना, “जेव्हापासून मधुमेह मला जडला…तेव्हापासून चहा मी सोडला!”या निशिकांत गुमास्ते यांच्या कवितेने कविसंमेलनाचा प्रारंभ झाला.

“वाफाळलेला चहा, शेकोटीची उष्णता…सर्वाना उब देता देता स्वतःला समर्पित करता…”या कवितेतून शोभा जोशी यांनी आध्यात्मिक भावार्थ कथन केला. सविता इंगळे यांनी आपल्या मुक्तछंदातून चहाच्या बहाण्याने जवळीक साधू पाहणाऱ्या गुलछबू प्रेमिकाचे वर्णन केले. चहाचे विविध प्रकार, चहाबाजांच्या सवयी आणि प्रसिद्ध साहित्यिकांच्या शब्दांतून चहाचे वर्णन करीत वर्षा बालगोपाल यांनी चहाविषयीचे विविध पैलू कवितांमधून मांडले. उमा माटेगावकर यांनी सादर केलेल्या गीताने श्रोत्यांना नाट्यगीताची अनुभूती मिळाली. आय.के.शेख यांची गवळण रसिकांची दाद घेऊन गेली.

“बकूळफुलांचा मंद गंध…पौर्णिमेच्या चांदण्याचं झिरपणं…”ही नंदकुमार मुरडे यांची तरल कविता उपस्थितांना भावली; तर “आता जमून येथे आलाच योग आहे…रंगात रंगण्याला धावून ये कविते…”या प्रा.तुकाराम पाटील यांच्या रचनेने मैफलीत खऱ्या अर्थाने रंग भरले.

दिनेश भोसले, जयश्री गुमास्ते, देवेंद्र गावंडे, संगीता झिंझुरके यांच्या विशेष लक्षणीय कवितांनी उत्तरोत्तर रंगत गेलेले कविसंमेलन सुरेश कंक यांच्या इरसाल लावणीने अधिकच बहारदार झाले. सुमारे पंचवीस कवींनी या काव्यमैफलीत सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या संयोजनात प्रकाश घोरपडे, अरुण परदेशी, शरद शेजवळ, बाळासाहेब घस्ते यांनी सहकार्य केले. सुरेश कंक यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी स्वागत केले. माधुरी विधाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.