Pimpri Fire News : पिंपळे निलख आग प्रकरण; गणपतीसमोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथे एका इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना रविवारी (दि. 12) दुपारी घडली. ही आग गणपतीसमोर लावलेल्या दिव्यामुळे लागली असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

गोविंद मिलाने (वय 20), रेखा मिलाने (वय 45) अशी जखमींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विशाल नगर, पिंपळे निलख येथे ओपुला सोसायटी ही 18 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये सोळाव्या मजल्यावर आशिष मिलानी यांचा चार बेडरूम, किचन, हॉल असा मोठा फ्लॅट आहे.

ओपुला सोसायटीच्या शेजारी असलेल्या एका सोसायटीमधून एका महिलेने रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला फोनवरून माहिती दिली की, त्यांच्या सोसायटी समोर असलेल्या ओपुला सोसायटीत आग लागली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन विभागाचे दोन आणि रहाटणी उपकेंद्राचा एक असे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन विभागाचे 27 जवान घटनास्थळी दाखल झाले. सोळाव्या मजल्यावर आशिष मिलानी यांच्या फ्लॅटमध्ये आग लागली होती. सोसायटी मधील वॉटर स्प्रिंकलर सिस्टम / स्प्रिंकलर पंप कार्यान्वित नसल्याने आग स्वतःहून नियंत्रणात राहिली नाही.

सोसायटीमध्ये बसविण्यात आलेल्या फायर हायड्रंट सिस्टीमचा वापर करून पाण्याच्या साह्याने मारा करून आग संपूर्ण विझवण्यात जवानांना यश आले. या घटनेत दोघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिलानी यांनी त्यांच्या घरात गणपतीची स्थापना केली होती. गणपती समोर त्यांनी दिवा लावला होता. फ्लॅटमध्ये पूर्ण फर्निचर, पीओपी लाइटनिंग केले होते. आग लागल्यानंतर आगीने रुद्र रूप त्वरित धारण केले.

दोन बेडरूम जळाले नाहीत. मात्र, त्यात धूर गेल्याने त्याचे संपूर्ण नुकसान झाले आहे. किचनमध्ये पूर्ण फर्निचर असल्याने आगीत जळल्यानंतर किचनच्या केवळ भिंती उरल्या असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.