BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Nilkh: सोसायटी सदस्यांनी टाकला गेटवरच कचराः  महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपळेनिलख येथील प्रशस्त असलेल्या गंगा ओसिएन या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी चक्क सोसायटीच्या गेटवरच कचरा टाकल्याने  महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा गेटच्या आतमध्ये टाकला तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे.

पिंपळे निलख येथे गंगा ओसिएन ही मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. सोसायटीमधील रहिवाशांनी कचरा गेटवरच उघड्यावर टाकला आहे. काळ्या प्लास्टिक बॅगमध्ये कचरा फेकला गेला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आज (बुधवारी) सकाळी शहरात पाहणी करत होते. त्यावेळी  गंगा ओसिएन सोसायटीच्या गेटबाहेर कचऱ्याचे ढीगच्या-ढीग साचले होते.

या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांनी यापूर्वीही वारंवार सूचना दिली होती. दंडात्मक कारवाई करण्याची तंबी देखील दिली होती. तरीदेखील रहिवाशांकडून कचरा गेटवरच टाकला जात होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज गेटवरील कचरा गेटच्या आतमध्ये टाकला. तसेच पाच हजार रुपये दंडदेखील वसूल केला आहे, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले. नागरिकांच्या अनारोग्यास कारणीभूत ठरणारे असे प्रकार यापुढे असे प्रकार पालिका प्रशासन सहन करणार नाही, हेच पालिकेने यातून सूचित केल्याची परिसरातील नागरिकांत चर्चा आहे.

Advertisement