Pimple Nilkh News : मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात; रयत विद्यार्थी परिषदेचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. विनाप्रक्रिया सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टीस धोका असल्याचे वारंवार पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत लक्ष वेधण्यासाठी उद्या (मंगळवारी) रयत विद्यार्थी परिषद लाक्षणिक उपोषण करणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर मंगळवारी दुपारी बारा वाजता उपोषण करणार आहे. लॉकडाऊन काळावधीत पालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे पिंपळे निलख येथिल मैला शुद्धीकरण केंद्राची तक्रार केली होती. या मैला शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टीस धोका असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले होते. या मैला शुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात बायपास द्वारे सोडण्यात येत होते.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे ई-मेल द्वारा तक्रार केली होती. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाकडे लेखी खुलासा मागितला होता. तो आजतागायत महापालिकेने दिला नाही.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना तक्रार व तक्रारीसंदर्भात स्मरणपत्र देऊन सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या गुणवत्तेबाबत आणि कामगारांच्या आरोग्याबाबत तक्रारी करूनसुद्धा पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी आणि शहर अभियंता रामदास तांबे यांना भेटून संबंधित प्रकाराची तक्रार करूनही कसलीही कारवाई होत नसल्याने आणि आयुक्त स्वत: तक्रारदारास भेटण्यास वेळ देत नसल्यामुळे नाईलाजाने आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहेत.

पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्र पुर्ण क्षमतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराकडे भाडेतत्त्वावर न देता स्वत: पालिकेने चालवावा.

07/08/2020 पासून 07/10/2020 पर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. श्री विनय इंजिनिअरिंग प्रा. ली या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.

पिंपळे निलख येथील जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाईन पुर्णपणे उखडून टाकावी. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी म्हणून पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.