Pimple Saudagar: रविवारी पिंपळे सौदागरमध्ये ‘थ्रीडी वॉकेथॉन’; पाच हजार नागरिक सहभागी होणार

एमपीसी न्यूज – अँडॉर ट्रस्ट आणि राहुल कलाटे यांच्या वतीने येत्या (रविवारी) पिंपळे सौदागर येथे ‘थ्रीडी वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा वाजता वॉकेथॉनला सुरुवात होणार असून यामध्ये सुमारे पाच हजार नागरिक सहभागी होणार आहेत.

याबाबतची माहिती आयोजक शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला समन्वयक प्रा. दीपक येवले, डॉ. वेदा नलावडे उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापासून रविवारी सकाळी साडेसहा वाजता या वॉकेथॉनला सुरुवात होईल. कोकणे चौक – कल्पतरु चौक – कोकणे चौक असा या वॉकेथॉनचा पाच किलोमीटरचा मार्ग असणार आहे. आरोग्य आणि जीवनशैलीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम घेतला जात आहे. स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व हे जनजागृती अभियान डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी 2013 मध्ये सुरु केले. हेच अभियान सातत्याने पुढे राबविले जात आहे.

या वॉकेथॉनचे ड्रोनद्वारे छायाचित्रण केले जाणार आहे. यामध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली जाणार आहे. तसेच सेलिब्रिटींसह विविध मान्यवर यामध्ये सहभागी होणार आहेत. या वॉकेथॉनमध्ये सेल्फी पॉईंटवर फोटो काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. शनिवार (दि. 14) पर्यंत विनाशुल्क नोंदणी सुरु राहणार आहे. या अभियानात सहभागी होणा-यांना प्रमाणपत्र, टोपी, टी-शर्ट दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा.दीपक येवले यांच्याशी 7588592289, 9420169220 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक राहुल कलाटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.