Pimple Saudagar: जुन्या सायकल शेअरिंग सेवेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्याने उद्‌घाटन कशासाठी ? नाना काटे

दोन रुपायाला तासासाठी मिळणा-या सायकलसाठी स्मार्ट अंतर्गत दहा रुपये का मोजावेत ?

 

एमपीसी न्यूज – पिंपळेसौदागर परिसरात नोव्हेंबर 2017 मध्येच सायकल शेअरिंग हा उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाममात्र दरात ही सुविधा नागरिकांना मिळत आहे. एका तासाला फक्त दोन रुपये शुल्क आकारले जात होते. असे असताना सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीअंतर्गत जुन्याच सेवेला मुलामा देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते नव्याने उद्‌घाटन करण्याचा घाट कशासाठी घातला आहे?, असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी उपस्थित केला. तसेच ही योजना चांगली असून याला राष्ट्रवादी काँग्रेसचा कसलाही विरोध नाही. परंतु, जुन्याच योजनांचे पुन्हा उद्‌घाटन करणे ही कोणती प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे असेही ते म्हणाले.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपळेगुरव व पिंपळेसौदागार भागात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू केला जाणार असून त्याचे उद्‌घाटन उद्या (रविवारी) करण्याचे नियोजित आहे. सायकल ट्रॅक व पायाभूत सुविधा तयार नसतानाच पालिकेने हा उपक्रम सुरु करण्याचा घाट घातला आहे.

त्यापार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक नाना काटे, शीतल काटे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाना काटे यांनी म्हटले आहे की, पिंपळेसौदागर परिसरात नोव्हेंबर 2017 मध्येच सायकल शेअरिंग हा उपक्रम सुरु करण्यात आला असून तीनशे ते साडेतीनशे सायकली उपलब्ध करुन दिल्या आहेत. पर्यावरण व आरोग्याला अनुकूल अशी सेवा पिंपळेसौदागर परिसरातील 15 पेक्षा अधिक सोसायटीत सुरु केली आहे. झूमकार कंपनीच्या माध्यमातून ‘स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा’, पीईडीएल या नावाने प्रकल्प राबविला जात होता.

एका सायकलसाठी तासाला दोन रुपयाप्रमाणे ‘पीईडीएल’च्या समर्पित’ स्टेशन्स ‘वरून नागरिक सायकलचा वापर करत होते. त्यामुळे परिसरात फिरण्यासाठी व कमी प्रदूषण, कमी ट्रॅफिक जाम आणि सर्वात महत्वाचे चांगले जीवन दायी असा प्रकल्प सुरु होता. तथापि, पालिकेच्या वतीने काही दिवसांपुर्वी सर्व परिसरातील सायकली काढून घेतल्या आणि काही कालावधीनंतर दहा रुपये प्रति तास दराने हाच प्रकल्प पुन्हा ‘रिलॉंच्च’ होत आहे. या प्रकरणात जास्त दराने व जुनाच प्रकल्प पुन्हा राबविण्यात सत्ताधारी भाजपकडून  ‘स्मार्ट कामापेंक्षा’ ‘स्मार्ट प्रसिद्धीचा’ खटाटोप जास्त होताना दिसत आहे.

सायकल शेअरिंग उपक्रमाला आमचा विरोध नाही. सायकल ट्रॅक करणे गरजेचे होते. परंतु, सायकल ट्रॅक देखील केले नाहीत. तसेच पायाभूत सुविधा देखील नाहीत. अगोदर सायकल ट्रॅक आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्यात. त्यानंतरच हा उपक्रम सुरू करावा. तसेच शुल्क देखील कमी करावे, अशी आग्रही मागणी नगरसेवक नाना काटे, शीतल काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.