Pimple Saudagar News : सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांसाठी लसीकरण मोहिम राबवा : नाना काटे

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 28 रहाटणी पिंपळे सौदागरमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खासगी सफाई कामगार, घर कामगार, सुरक्षा रक्षक, व बांधकाम कामगार यांच्यासाठी दोन दिवसीय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात यावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महाराष्ट्र शासन निर्देशानुसार लस उपलब्धेनुसार 18 वर्षांपुढील पुढील सर्व नागरिकांचे शहरात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच शहरातील खासगी रुग्णालयामध्ये देखील शासन निर्देशानुसार लसीकरण करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळे सौदागर येथे रहिवासी सोसायटी संख्या जास्त आहे. येथे घर काम करणारे घर कामगार, खासगी सफाई कामगार, सुरक्षारक्षक यांची संख्या देखील जास्त आहे.

येथे नव्याने रहिवासी बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अशा बांधकाम साईट वर काम करणारे देखील अनेक कामगार आहेत. यातील बहुतेक नागरिकांकडे स्मार्ट फोन नाही, कोणतेही ओळखपत्र नाही व अनेकजण अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही.

हातावर पोट असल्याने त्यांना खासगी लसीकरण केंद्रावर जावून लस घेणे शक्य नसल्याने अशा नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. या कामगारांचा कामाच्या ठिकाणी एक ना अनेक लोकांशी वारंवार संपर्क येत त्यामुळे त्यांचे लसीकरण करणे महत्वाचे आहे. शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी करोना प्रतिबंधित लस घेणे हे प्रभावी अस्त्र आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.