Pimple Saudagar News: महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लिनिअर गार्डनची वाताहात – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पिंपळेसौदागर येथील लिनिअर गार्डनची वाताहात झाली आहे. गार्डनमध्ये सुरक्षारक्षक ठेवावेत आणि वेळचे निर्बंध घालावेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे. तसेच गार्डनमध्ये प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार करून शुल्क आकारले जावे, अशी मागणीही त्यांनी केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक काटे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर येथे महापालिकेच्या वतीने 11 कोटी रुपये खर्चून शहरास शोभेल, असे लिनिअर गार्डन तयार केले आहे. हे गार्डन ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, नागरिक यांच्यासाठी बनवले आहे. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे गार्डनचे काही काम अपूर्ण अवस्थेत आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटी, पोलीस यांच्या दुर्लक्षामुळे लिनियर गार्डनची अवस्था दयनीय झाली आहे. या गार्डनमध्ये नागरिकांऐवजी टवाळखोर व प्रेमीयुगल यांचा वावर वाढला आहे. या गार्डनमध्ये प्रवेश करण्यासाठी चार ठिकाणी प्रवेशद्वार ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उपद्रव करणारे कुठूनही प्रवेश करतात. त्यांना रोखण्यास गार्डनमध्ये कोठेही पालिका अथवा पोलिसांतर्फे सुरक्षा व्यवस्था नाही.

लिनियर गार्डनमध्ये प्रवेशाच्या वेळा निश्चित करून पोलिसांच्या मदतीने सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा तैनात करावी. योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. तसेच गार्डनमध्ये येण्यास एकच प्रवेशद्वार करून शुल्क आकारले जावे, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.