Pimple Saudagar News : शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केली. पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले. 19 ऑक्टोबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली.

निलेश भालचंद्र जगताप (वय 42, रा. गणेश कॉम्पलेक्स, आंबेगाव बु.) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जितेंद्र सुखलाल मालखेडे (वय 38, रा. निगडी, प्राधिकरण) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र याने फिर्यादी निलेश व त्यांचे नातेवाईक सुर्यकांत काळे यांना शेअर मार्केट गुंतवणूकीतून पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी 94 लाख 80 हजार रूपये आणि काळे यांनी 80 लाख रूपये असे एकूण 1 कोटी 74 लाख 80 हजार रुपये गुंतवण्यासाठी दिले.

सुरवातीला परतावा म्हणून फिर्यादी यांना 37 लाख 82 हजार 121 रूपये आणि काळे यांना 13 लाख 55 हजार रूपये दिले. दोघांना मिळून 51 लाख 35 हजार रूपये मिळाले. त्यानंतर आरोपीला वारंवार संपर्क केला तर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत भेटण्यास टाळाटाळ केली. आरोपीने दोघांचे 1 कोटी 23 लाख 44 हजार 879 रूपये न देता आर्थिक फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. सागंवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.