Pimple Saudagar News : संजय भिसे यांची मातापित्यांना आगळीवेगळी गुरुवंदना

एमपीसीन्यूज : आदी गुरूशी वंदावे ! मग साधन साधावे !! गुरु म्हणजे मायबाप ! नाम घेता हरतील पाप !! या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या भिसे कुटुंबातील संजय भिसे यांनी सपत्नीक त्यांच्या मातोश्री सौ. कांताबाई आणि वडील श्री. तात्याबा यांचे पाद्यपूजन केले. पंचामृताने मातापित्यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यामुळे त्यांच्या मातापित्यांचा उर अभिमानाने भरून आला. तसेच त्यांच्या मुखातून समाधानाचे भाव व्यक्त झाले. या आदर्श अशा गुरुपौर्णिमा सोहळ्याची चर्चा शहरात सुरु आहे.

भिसे कुटुंबीय परंपरांगत वारकरी आणि शेतकरी. पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत वेगाने विकसित झालेले पिंपळे सौदागर हे त्यांचे गाव. पिंपळे सौदागरचा पूर्ण कायापालट झाला असून अनेक उच्चभ्रू सोसायट्यांची गावाचे गावपण केव्हाच हरवून गेले.

मात्र, भिसे कुटुंबीयांनी आपला वारकरी संप्रदायाचा वारसा मोठ्या आभिमानाने जपला आहे. शिवाय कुटुंबातील नात्यांचा ओलावा जपत वडीलधाऱ्यांविषयीचा आदर तसूभरही कमी होऊ दिला नाही.उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे हे त्या पैकीच एक.

महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेचे संपर्कप्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. शुक्रवारी ( दि. 23) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संजय भिसे आणि त्यांच्या पत्नी कुंदा भिसे यांनी त्यांच्या मातोश्री सौ. कांताबाई आणि वडील श्री. तात्याबा यांचे पाद्यपूजन केले. पंचामृताने मातापित्यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या मातापित्यांचा उर अभिमानाने भरून आला. तसेच त्यांच्या मुखातून समाधानाचे भाव व्यक्त झाले. या पूजन सोहळ्याचे पौराहित्य समीर हर्डीकर यांनी केले.

  आई-वडील हे आपले प्रथम गुरू. त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व सुरू होते. आपले घर म्हणजे आपली शाळा आणि आपले आई-वडील त्या शाळेतील गुरू. हातात बोट धरून चालायला शिकवणारे तसेच अनेक संस्कार करणारे आद्यगुरू. आई-वडिलांनी दिलेले ज्ञान आणि संस्कार आपल्याला आयुष्यातील कुठल्याही संकटाचा सामना करण्याचे बळ देत असतात. चांगले विचार आणि संस्कार देऊन माझं जीवन घडवणाऱ्या आई-वडिलांचे पूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. संजय भिसे : संपर्कप्रमुख, महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड शाखा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.