Pimple Saudagar : विश्वशांती कॉलनी समस्यांच्या विळख्यात!; मूलभूत समस्या सोडविण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करीत, पिंपळे सौदागर परिसराचा स्मार्ट सिटीत समावेश केला. महापालिका आयुक्त यांनीही या परिसराला भेटी-गाठी देत, कामांचा आढावा घेत, विकासकामांना गती देण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. परंतु, महापालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. या भागातील मूलभूत समस्या सोडविण्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी प्रसिद्धीस निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने पिंपळे सौदागर परिसरातील विश्वशांती कॉलनी व अंतर्गत भागात ड्रेनेजलाईनसाठी खोदकाम केले. त्यासाठी डांबरी रस्ताही उखडण्यात आला. ड्रेनेजलाईन दुरुस्ती व नवीन ड्रेनेजलाईन चे काम संपल्यानंतर खोदकाम करण्यात आलेला रस्ता पूर्वरत केला नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

  • डांबरीकरण न केल्यामुळे रस्त्यावरील राडारोडा तसाच पडून राहिला. सध्या पावसाळा सुरु झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या राडारोड्यामुळे या परिसरात चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाही मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचीही तारांबळ उडत आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी समस्या मांडूनही याची दखल घेतली जात नाही.

पावसाचा जोर पाहता, नजीकच्या काही दिवसात येथील परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्यांची त्वरित विल्हेवाट लावावी. अन्यथा पुढील परिस्थितीस महापालिका प्रशासन जबाबदार असेल, असे काटे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.