Pimple Saudagr : परिसरातील चिमुरडीवरील अत्याचार, खून करणा-याला त्वरित पकडावे

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर भागातील कामगार वस्तीत राहणाऱ्या एका अडीच वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष बलात्कार करत तिचा खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली. या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याने त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

या घटनेसंदर्भात शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सुस्त पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत पोलीस आयुक्त पद्मनाभन यांची भेट घेतली. या घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

  • यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे,विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेविका शितल नाना काटे, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, मयूर कलाटे, नगरसेवक रोहित काटे, नगरसेवक गणेश भोंडवे, राजू मिसाळ, राजू बनसोडे, शेखर ओव्हाळ, लाला चिंचवडे, मनीषा गटकळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नगरसेवक नाना काटे यांनी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला. ते म्हणाले की, पिंपळे सौदागर येथे घडलेली घटना म्हणजे क्रौर्याची परिसीमा आहे. शहरातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात देखील आता गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली दिसत आहे. कधीकाळी सर्वसामान्य कष्टकऱ्यांची असलेल्या या औद्योगिक नगरीला आज गुन्हेगारांचे नंदनवन म्हणून नवी ओळख प्राप्त होत आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी त्यात कमालीची वाढ झाली आहे.

  • दरम्यान, पोलिसांना जर शहरातील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राखण्यात अपयश येत असेल. शहरातील गुन्हेगारीला आळा घालता येत नसेल तर शहरातील पोलीस आयुक्तालय बंद करण्यात यावे. तसेच या सर्व घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावेळी करण्यात आली.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.