Pimple Saudgar: साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; महापौरांचे हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने औंध ते काळेवाडी र्ता साई चौक येथे उभारण्यात आलेला उड्डाणूपल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (सोमवारी) पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेवक संदीप कस्पटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, वाकड फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुरेश राजे , सेक्रेटरी के.सी.गर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

प्राधिकरणाकडून मागीलवर्षी दोन पुलांपैकी काळेवाडीकडून पुण्याकडे जाणारा एक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या 700 मीटर लांबी आणि 8 मीटर रुंदी असलेल्या पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या पुलाचे काम फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. हा मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

पुण्याकडून काळेवाडी, डांगे चौकाकडे जाण्याच्या वाहनांना जगताप डेअरी चौकामधून वळसा मारून जावे लागत होते. याचा परिणाम म्हणून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत महापालिकेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नगरसेवकांनी प्राधिकरणाकडे पूल खुला करण्याची मागणी केली होती. परंतु, प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हा पुल वाहतुकीसाठी खुला केला. या पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांच्या वेळेत बचत होणार असून वाहतुकीची मोठी समस्या सुटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.