Pimple Gurav : पिंपळे गुरव येथील अतिक्रमण कारवाईत दुजाभाव

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा आरोप

एमपीसी न्यूज – दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपळे गुरव येथे केलेली अतिक्रमण कारवाई ही केवळ सत्ताधा-यांच्या सांगण्यावरुन केली असून, यामध्ये फक्त राष्ट्रवादीच्या लोकांना टार्गेट केले असल्याचा आरोप माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, ” सत्ताधारी बोले , और प्रशासन चाले ” अशी परिस्थिती सध्या शहरात सुरु आहे. सत्तेचा वापर नागरिकांच्या विकासासाठी न करता तो केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी होत आहे. सत्ताधा-यांच्या सांगण्यावरुन बीट निरिक्षक आणि अधिका-यांनी नागरिकांकडून पैसे उखळण्याचा नवीन धंदा सुरु केला आहे.

पिंपळेगुरव परिसरातील सुमारे दहा ते बारा टोलेजंग अनाधिकृत व्यावसायिक इमारतीचे फोटो मी पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले होते. याकडे मात्र साफ कानाडोळा केला आणि ज्यांनी निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपच्या विरोधात काम केले अशा व्यक्तींना टार्गेट करुन अतिक्रमण कारवाई केली आहे . पालिका प्रशासनाला कारवाई करायची असेल,  तर होणारा राजकीय हस्तक्षेप न जुमानता सरसकट कारवाई करावी , अगोदर टोलेजंग व्यावसायिक इमारती पाडाव्यात. नागरिकांचा अंत तुम्ही पाहू नका, अन्यथा याचे परिणाम सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाला लवकरच भोगावे लागतील, असा इशाराही राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.