PimpleSaudagar : अखेर पाण्याच्या टाकीच्या कामाला मिळाला मुहूर्त !

पाण्याच्या टाकीच्या कामाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर मधील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी येथील राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. या टाकीच्या कामाचे भूमिपूजन आज, मंगळवारी सकाळी आमदार लक्ष्मण जगताप, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका शीतल काटे, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे गेली अनेक वर्षे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता.

रोझलँड रेसिडेन्सी शेजारील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये 20 दशलक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात येणार आहे. सध्या पिंपळे सौदागर गावठाणातील एकाच टाकीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी लोकसंख्या जेवढी होती त्याच्या दुप्पट तिप्पट लोकसंख्या वाढलेली आहे.

परंतु पाणी पुरवठ्यात काही वाढ झाली नाही .त्यामुळे साहजिकच पाणी प्रश्न गंभीर बनत चाललेला होता. त्यामुळे नगरसेवक नाना काटे यांनी पाच वर्ष पासून नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी आयुक्ताकडे वारंवार पत्राद्वारे मागणी केली होती.त्यानंतर एक वर्षापूर्वी अमृत योजनेअंतर्गत या टाकीची निविदा मंजूर करण्यात आली. पण कामाला काही सुरुवात करण्यात आली नव्हती. पाणीप्रश्न अधिक जटील होत असल्यामुळे दि.०३ जानेवारी रोजी पालिका आयुक्तांना पत्रकाद्वारे या टाकीच्या कामामध्ये कुणाचा स्वार्थ लपलेला आहे का? असा जाब विचारून महापालिकेचे लक्ष वेधले होते.

या पाण्याच्या टाकीची उंची 21 मीटर, अंदाजित खर्च 1 कोटी 23 लाख रुपये आहे, टाकी बांधण्यासाठी मे. अरिहंत कंट्रक्शन या ठेकेदारला काम दिलेले आहे. टाकी पूर्णत्वाची तारीख जानेवारी 2020 पर्यंत आहे. या टाकीवरून वाकड – भोसरी बीआरटी एस रोड ते काटेवस्ती रोड, गणेशम फेज 1, साई आर्केट, रोझआयकॉन, ट्रेजरी बेत, लक्षदीप पेलेस, प्लॅनेट मिलेनियम सोसायटी, साई व्हिजन, साई अँबीयंस सोसायटी या परिसराला पाणीपुरवठा होणार आहे.

तसेच यावेळी रहाटणी, रामनगर येथील अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले
यावेळी सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, माजी नगरसेवक शंकर काटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.