Pimpri : कवी जागरती’ संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – “को जागरती? या प्रश्नाचा हेतू अभिव्यक्त होण्याशी निगडित आहे. जोपर्यंत मानव अस्तित्वात आहे, तोपर्यंत काव्य- शास्त्र- विनोदाच्या माध्यमातून तो व्यक्त होतच राहणार आहे. ‘कवी जागरती’ ही संकल्पना कवितांपुरती मर्यादित न राहता समाजाभिमुख व्हावी!” असे विचार ज्येष्ठ कवी नंदकुमार मुरडे यांनी मांडले. कोजागरी पौर्णिमेनिमित्त शब्दधन काव्यमंचाने ‘कवी जागरती’ या संकल्पनेच्या माध्यमातून काव्यजागर करण्यात आला.

या काव्य मैफिलीत पस्तीस कवींनी चंद्र, चांदणे या प्रतिमांचा आविष्कार करणाऱ्या विविध आशय आणि आकृतिबंधातल्या कविता सादर केल्या. काव्यमैफलीचा प्रारंभ सुरेश कंक यांनी ‘हम किसीसे कम नहीं’ या चित्रपटातील महंमद रफी यांच्या “चांद मेरा दिल, चांदनी हो तुम…”या गीताने केला. कवी सुहास घुमरे यांची चांदण्यांच्या प्रतीकामधून मुलगी आणि बापाचे हृद्य अनुबंध अधोरेखित करणारी कविता रसिकांची दाद घेऊन गेली.

माधुरी विधाटे यांच्या गीताने टिपूर चांदण्याचा गहिरा प्रत्यय रसिकांना दिला. मानसी चिटणीस यांच्या ओव्या उपस्थितांना भावल्या; तर आनंद मुळूक यांच्या विडंबनाने खळखळून हसवले.अरुण कांबळे, उमा मोटेगावकर, सीमा गांधी, दीपेश सुराणा, फुलवती जगताप, सविता इंगळे, प्रदीप गांधलीकर, सुभाष शहा, पीतांबर लोहार, श्यामला पंडित, शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ, शिवाजीराव शिर्के, संगीता जोशी, अशोक कोठारी, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, धनाजी घाडगे, प्रशांत पोरे, नीलेश शेंबेकर, बी.एस.बनसोडे, तुकाराम पाटील, अभिजित काळे, रघुनाथ पाटील यांच्या कविता उल्लेखनीय होत्या.

सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मुरलीधर दळवी, अण्णा जोगदंड, अमित मुरडे, जयश्री गुमास्ते, सुखदा मुरडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. निशिकांत गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले. कवयित्रींनी ‘दुर्गे दुर्घट भारी’ ही देवीची आरती म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.