Pimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर!

टंकलेखन प्रमाणपत्र सादर न केल्याने कारवाई, आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा निर्णय

एमपीसी न्यूज – महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्ती दिल्यानंतर दोन
वर्षाच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अकरा लिपिकांना मजूर व्हावे लागले आहे. त्यांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणत गट ‘ड’ मधील मजूर पदावर नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

लिपिक अभय अनिल चौगुले, संतोष जगन्नाथ बोत्रे, सिताराम काळू मदगे, खुशाल हरीश पुरंदरे, सुशांत प्रकाश गायकवाड, मिना उमेश पालकर, संकेत विष्णु वाळंज, सनी ज्योतीबा पवार, सुरज रामदास पाटोळे, पृथ्वीराज सहादू निकाळजे, संकेत सुरेश जंगम या अकरा जणांना लिपिक पदावरून पदावनत करण्यात आले आहे. यापुढे त्यांना मजूर पदावर राहून काम करावे लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या विविध विभागातील लिपिक पदावर कार्यरत असलेल्या अकरा लिपिकांची नियुक्ती अनुकंपावर करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी दिला होता. दोन वर्षाच्या कालावधीत त्यांनी अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्यामुळे 11 लिपिकांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर कर्मचा-यांनी विभाग प्रमुखांना खुलासे केले होते. मात्र ते खुलासे समाधानकारक वाटले नाहीत. त्यामुळे आयुक्त हर्डीकर यांनी या अकरा जणांची लिपिक पदाची सेवा संपुष्टात आणली असून त्यांची गट ‘ड’ मधील मजूर पदावर रवानगी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.