Pimpri : 11 दिवसात 10 हजार रुग्ण; शहरातील रुग्णसंख्या 30 हजार पार

आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत 442 नवीन रुग्णांची भर पडली आहे. : 10 thousand patients in 11 days; The number of patients in the city crossed 30 thousand

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला एक हजारहून अधिक रुग्णांची भर पडत असून शहरातील रुग्णसंख्या 30 हजार पार झाली आहे. मागील 11 दिवसांत तब्बल 10 हजार नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आज (मंगळवारी) दुपारी दोन वाजेपर्यंत 442 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 30 हजार 984 झाली आहे. 10 मार्च ते 11 ऑगस्ट या 164 दिवसात औद्योगिकनगरीतील रुग्णसंख्या 30 हजाराच्या पुढे गेली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्ण सापडण्याचा उच्चांक होत आहेत. दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. रुग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टअखेरपर्यंत 50 हजार होईल ,असा प्रशासनाचा कयास आहे.

त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 30 जुलै पर्यंत शहरातील रुग्णसंख्या 20 हजार होती. त्यानंतर 31 जुलै ते 10 ऑगस्ट या 11 दिवसात तब्बल 10 हजार नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत औद्योगिकनगरीतील रुग्ण संख्या 30 हजार 984 वर पोहोचली आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा ? 

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 12,311 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 9313 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वय वर्ष असलेल्या 2900 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 2772 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 3678 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

21,356 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात, 9127 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 21,356 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सध्या 9127 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 6533 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 816 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून 114 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 58 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर, आजपर्यंत शहरातील 501 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.