Pimpri : चिखली पोलीस ठाण्यात 100 पोलीस कर्मचाऱ्यांची बदली

एमपीसी न्यूज – सलग झालेल्या दोन खुनाच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चिखली पोलीस ठाण्यासाठी कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. चिखली पोलीस ठाण्यात निगडी, सांगवी, चिंचवड पोलीस ठाणे आणि नियंत्रण कक्षातून एकूण 100 कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. नवीन आलेल्या मनुष्यबळामुळे चिखली पोलीस ठाणे लवकरच कार्यरत होणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्तांनी शनिवारी (दि. 6) काढले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यासाठी 5 सहाय्यक फौजदार, 28 पोलीस हवालदार, 28 पोलीस नाईक, 4 महिला पोलीस नाईक, 19 पोलीस शिपाई, 16 महिला पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी निगडी पोलीस ठाण्यातून 81, सांगवी पोलीस ठाण्यातून 2, चिंचवड पोलीस ठाण्यातून 1 आणि नियंत्रण कक्षातून 16 असे वर्ग करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून कित्येक महिने उलटले, मात्र पुणे पोलीस आयुक्तालयाने याकडे दुर्लक्ष केले. जुलै 2018 च्या सुमारास निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांची बदली चिखली पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेच पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाल्याने या बदलावर फारसा परिणाम पडला नाही. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभम यांनी मागील आठवड्यात शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे कारभारी बदलून मोठा फेरबदल केला. यातच पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागात कार्यरत असलेले विवेक वसंत मुगळीकर यांची चिखली पोलीस ठाण्यात अंतर्गत बदली करण्यात आली. यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात फौजफाटा देण्यात आल्याने आता चिखली पोलीस ठाणे लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.