Pimpri : साडेसात दिवसात चिंचवड ते कन्याकुमारी सायकलप्रवास

इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांचा पराक्रम

एमपीसी न्यूज – चार राज्य, 22 जिल्हे, 11 मोठे घाट, डोंगररांगा, किनारपट्टीचा प्रदेश, कात्रज व खंबाटकीचे घाट व बंडीपूर व वायनाडचे घनदाट जंगल पार करून तब्बल 1638 किलोमीटरचा प्रवास साडेसात दिवसात इंडो सायकलिस्ट क्लबचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, सदस्य व प्राज कंपनीचे शंकर गाढवे व उद्योजक हाज्जी देवनीकर यांनी 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात पूर्ण केला. हा प्रवास आजवरचा सर्वात जलद सायकल प्रवास ठरला आहे.

इंडो सायक्लिस्ट क्लबच्या सदस्यांनी शुक्रवार (दि. 8) रोजी पहाटे चार वाजता मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड पासून प्रवास सुरु केला. यावेळी इंडो सायकलिस्ट क्लबचे कोअर कंमीटीचे अजित पाटील, विश्वकान्त उपाध्याय, गणेश भुजबळ, अमित खरोटे तसेच ज्ञान प्रबोधिनीचे 20 ते 25 विद्यार्थी, पालक व शिक्षक अवधूत गुरव, अनुराग हिंगे व इंडो सायकलिस्ट क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते. गणपतीबाप्पाला नारळ फोडून पहिल्या दिवसाचा प्रवास सातारा-कोल्हापूरच्या दिशेने सुरु झाला. कोणत्याही प्रकारची सपोर्ट वन सोबत न घेता पाच ते सात किलो वजन सोबत घेऊन सेल्फ सपोर्टेड हा प्रवास करण्यात आला.

दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या चार राज्यामधून सायकल प्रवास झाला. इंडो सायकलिस्ट क्लबने आजपर्यंत विविध सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. त्यात पर्यावरण, सायकल वापर व आरोग्य हे संदेश तर होतेच त्याचसोबत बदलती शिक्षण पद्धती किंवा आज शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळीच दखल घ्यावी आणि योग्य ती कार्यवाही व्हावी, शिक्षण सम्राटांना जमत नसेल तर त्यांनी आपल्या संस्था बंद कराव्यात. विविध राज्यांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून शिक्षण हा सर्वांचा मूलभूत हक्क आहे, असा संदेश देण्यात आला आहे.

इंडो सायक्लिस्ट क्लबचे सदस्य दररोज 80 ते 100 किलोमीटर सायकलिंग करत असल्याने मोहिमेतील सदस्यांना विशेष वेगळी तयारी करावी लागली नाही. सकाळी पाच ते दुपारी बारा पर्यंत सायकलिंग, दुपारी बारा ते चार पर्यंत विश्रांती आणि सायंकाळी चार ते आठपर्यंत पुन्हा सायकलिंग करायचा असा दिनक्रम आठ दिवस सुरु होता.

असा झाला चिंचवड ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास –

# दिवस 1 – चिंचवड ते नेर्ले ( कोल्हापूर ) – 206 किमी

# दिवस 2 – नेर्ले ( कोल्हापूर ) ते धारवाड – 229 किमी

# दिवस 3 – धारवाड ते चित्रदुर्ग – 233 किमी

# दिवस 4 – चित्रदुर्ग ते मैसूर – 218 किमी

# दिवस 5 – मैसूर ते कालिकत – 236 किमी

# दिवस 6 – कालिकत ते कोची – 200 किमी

# दिवस 7 – कोची ते तिरुअनंतपुरम – 214 किमी

# दिवस 8 – तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी – 100 किमी

"kanya"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.