Pimpri: चिंताजनक! एकाच दिवशी 11 जणांचे रिपोर्ट  पॉझिटीव्ह; आजपर्यंत 81 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी रुपीनगर परिसरातील  तब्बल 11 जणांचे रिपोर्ट  पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात प्रथमच एकाच दिवशी 11 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी रिपोर्ट आले आहेत. तर, गुरुवारी रात्री एका 31 वर्षीय पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. यामुळे कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा 60 वर पोहचला आहे. आजपर्यंत 81 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 21 जण कोरोनामुक्त झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

निगडी रुपीनगर परिसरातील एका 26 वर्षाच्या तरुणाचे कोरोनाचे रिपोर्ट गुरुवारी (दि.23) पॉझिटीव्ह आले होते. त्याच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील 25 जणांना महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यामध्ये 11 जण पॉझिटिव्ह  आहेत. त्यामध्ये सहा पुरुष असून सर्वांचे वय 25 ते 28 च्या दरम्यान आहे.  18 ते 24 वयोगटातील तीन महिला आणि तीन वर्षाच्या दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील सोळा दिवसांत 60 नवीन रुग्णांची भर!

शहरात 8 एप्रिल पासून दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच, 13 एप्रिल रोजी दोन, 14 एप्रिल  रोजी एकाच दिवशी सहा, 15 एप्रिल रोजी चार, 16 एप्रिल रोजी चार, 17 एप्रिल रोजी दोन, 18 एप्रिल रोजी सात, 19, 20, 21  एप्रिल रोजी प्रत्येकी एकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.  22 एप्रिल रोजी तीन, आज 23 एप्रिल रोजी तीन आणि आज 24 एप्रिल रोजी  एकाच दिवशी 11 रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने मागील सोहळा दिवसात तब्बल 60  नवीन रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील आणि शहराबाहेरील पण शहरात उपचार सुरू आहेत अशा 82 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 60 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 50 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तर शहरातील नऊ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महापालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, रविवारी (दि.12) थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. सोमवारी (दि.20) निगडी भागातील रहिवाशी पण पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका महिलेचा आणि पुण्यातील रहिवाशी पण वायसीएममध्ये दाखल असलेल्या एका महिलेचा रविवारी (दि.20) एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.