Pimpri: 1192 गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यात 1 कोटी 48 लाखांची बक्षीसे जमा
एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या खात्यात बक्षीसे जमा करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रातील 1192 विद्यार्थ्यांना 1 कोटी 48 लाखांची बक्षीसे दिली आहेत. याबाबतची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी आणि नागरवस्ती विभागाचे प्रमुख उल्हास जगताप यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने महापालिका क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. 80 टक्यांहून अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना दहा हजार तर 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-या दहावीतील विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपये बक्षीस दिले जाते. तसेच बारावीतील ऐंशी टक्के गुण मिळविणाया विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते.
या योजनेसाठी महापालिकेकडे 4500 अर्ज प्राप्त झाले होते. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत 25 सप्टेंबर आहे. दरवर्षी बक्षीसाची रक्कम डिसेंबर महिन्यात दिली जाते. तथापि, आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता दोन दिवसामध्ये जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात 1192 विद्यार्थ्यांना बक्षीसाची रक्कम खात्यात जमा केली आहे. तसेच महापालिका शाळांत शिकणा-या 89 विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली आहेत.
त्यामध्ये तीन लखपती मुलांसह 80 टक्क्याहून अधिक गुण मिळविणा-यांना 25 हजार, 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणा-यांना पन्नास हजार, तर नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळविणा-यांना एक लाखांचे बक्षीस दिले जाते. तसेच अंध शाळेतील दहावीच्या मुलांना प्रत्येक पन्नास हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते. महापालिका शाळांतील 89 विद्यार्थ्यांना सुमारे 30 लाख 75 हजारांची बक्षीसे लाभार्थीच्या खात्यात जमा केली आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ”महापालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आलेल्या अर्जापैकी अकराशे अर्जाची छाननी पहिल्या टप्यात झाली. आचारसंहितेचा अडसर ठरू नये, म्हणून लाभार्थ्यांच्या खात्यात बक्षीसाची रक्कम जमा केली आहे. तसेच दुस-या टप्यातील बक्षीसांची रक्कम लवकरच लाभार्थींना देण्यात येईल”.