Pimpri : डॉ. हरीश तिवारी आणि पत्नी अमृता यांच्या नावे एकाच दिवसात 14 पेटंट्सची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅंड रिसर्च महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी आणि त्यांच्या पत्नी अमृता तिवारी यांनी मुंबई येथील भारतीय पेटंट आणि ट्रेडमार्क्स ऑफिस येथे एकाच दिवशी एकूण चौदा पेटंटस् ची नोदणी करून एक अनोखा जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने उभयतांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार केला.

 

दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणूस अनेक अडचणींचा सामना करीत असतो. अनेकदा काही वस्तू वापरताना वा विशिष्ठ कार्यपद्धतीचा अवलंब  करताना काही त्रुटी, असुविधा जाणवतात. परंतु त्याविषयी नाराजी व्यक्त होण्यापलीकडे काही ठोस घडत नाही. यावर संशोधन करून आपणच उपाय शोधून काढावा या उद्देशाने डॉ. हरीश आणि अमृता तिवारी  यांनी रोजच्या हाताळण्यात असलेली काही यंत्रे व उपकरणे यांच्यातील त्रुटी दूर करण्यासाठी  संशोधन करून त्यावर 14 पेटंटसची नोदणी केली आहे.

 

डॉ. हरीश तिवारी यांच्या नावावर आत्तपर्यंत चाळीस पेटंटसची नोद आहे. अगदी सुरुवातीपासूनच संशोधनाची, नाविन्याची आवड असलेल्या डॉ. तिवारी यांनी प्राचार्यपदावर रूजू झाल्यानंतर संस्थेच्या अध्यापक, विद्यार्थ्यी व कर्मचार्यांना पेटंटस, कॉपीराइटस, स्टार्टअप्स् इत्यादींविषयी मार्गदर्शन केले. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालत 2019 मध्ये पेटंटस, कॉपीराइटस, स्टार्टअप्स वर सिप्सीज ही देशातील सर्वप्रथम आणि एकमेव परिषद घेण्यात आली होती.

संशोधन करण्यासाठी फार मोठ्या पदव्यांची गरज नसते. ज्याला शालेय पातळीवरील मुलभूत विज्ञान माहित आहे, ज्याला वस्तू वा प्रक्रियेतील नेमकी त्रुटी चाणाक्षपणे हेरता येते आणि ज्याला अडचणीवर मार्ग शोधून काढण्याची तळमळ आहे, अशा प्रत्येकास संशोधन ही सहजसाध्य गोष्ट आहे असे डॉ.हरीश तिवारी सांगतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.