Pimpri: विरोधकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधा-यांची नरमाईची भूमिका !

कोणतेही सबळ कारण न देता महासभा तहकूब करुन काढला पळ  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता येऊन एक वर्षाचा काळ होत आला. वर्षभरात सत्ताधा-यांना विरोधकांनी प्रखर असा विरोध केला नव्हता. त्यामुळे या एक वर्षात पालिकेत विरोधकांचे अस्तित्वत आहे की नाही अशी परस्थिती होती. आज मात्र विरोधकांनी आक्रमक होत आपली भुमिका चोख बजावली. पाणीपट्टी वाढीवरुन राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या नगरसेवकांनी दुपारपासूनच पालिका मुख्यालयात आंदोलन करुन पालिका दणाणून सोडली. सभा सुरु होताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘तांब्या’ हातात घेऊन महापौरांसमोरील हौदात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता सत्ताधा-यांनी पाच मिनिटात सभा तहकूब करुन पळ काढला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची  फेब्रुवारी महिन्याची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) होती. या सभेच्या अजेंड्यावर  पाणीपट्टीत पाच टक्के, तर पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ करण्याचा विषय होता. पाणीपट्टी वाढीला विरोधीपक्षांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे विरोधक सकाळपासून या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. दुपारी बारा वाजता पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारसमोर मनसेने पाणीपट्टी वाढी विरोधात आंदोलानाला सुरुवात केली. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील या आंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तर महापालिकेमध्ये ‘तांब्या‘ हातात घेऊन आंदोलन केले. विरोधकांनी आंदोलन करुन पालिका दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-या भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर पालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या निषेधाच्या घोषणा विरोधकांनी  दिल्या. 

दुपारी दोन वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे नगरसेवक अधिक आक्रमक झाले. नगरसेवकांनी महापौरांच्या हौदासमोर धाव घेऊन पाणीपट्टीच्या विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. विरोधकांनी घोषणा देत सभागृह देखील दणाणून सोडले. या गोंधळातच भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी कोल्हापूर येथील पन्हाळगडावरुन सांगलीला शिवज्योत घेऊन जाणार्‍या टेंपोला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या शिवभक्तांना आणि विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्याची सूचना मांडली. नगरसेवक नामदेव ढाके यांनी त्याला अनुमोदन दिले. श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर महापौर काळजे यांनी छिदम याचा निषेध करत आहोत, असे सांगून महासभा 28 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. 

दरम्यान, गेल्या वर्षभरात पालिकेत विरोधक अस्तित्वात आहेत की नाही, अशी परस्थितीती निर्माण झाली होती. पालिकेत विरोधकांचे अस्तित्वत शुन्य वाटत होते. परंतु, पाणीपट्टी वाढीवरुन विरोधकांनी आज पालिकेत जोरदार आंदोलन करुन सत्ताधा-यांना घायाळ केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.