Pimpri: ‘हॅन्डब्रेक’वर उभी केलेली पीएमपी अचानक आली मागे; मोठा अपघात टळला(व्हिडिओ)

दुचाकींचे नुकसान; घटना ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यात कैद

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) बस चालकाने निष्काळजीपणा करत ‘हॅन्डब्रेक’वर उभी केलेली बस अचानक पाठीमागे आली. सुदैवाने पाठीमागे कोणीही नसल्यामुळे मोठा अपघात टळला. परंतु, दुचाकींचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या पाठीमागे पीएमपीएमएलचे बस स्थानक आहे. या स्थानकात पीएमपीएमलच्या बस उभ्या केल्या जातात. एम.एच 14 सीडब्ल्यू 2139 या बसवरील चालकाने बस ‘हॅन्डब्रेक’वर उभी केली. चालक बसमधून उतरुन बाहेर गेला. थोड्यावेळाने बस अचानक पाठीमागे येऊ लागली. ही बस पाठीमागे पार्क केलेल्या दुचाकींना धडकून भिंतीला धडकून जागेवर थांबली. सुदैवाने यावेळी पाठीमागून कोणीही जात नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

यामध्ये दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीएमपीएल बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे वाहनांचे नुकसान झाल्याचा आरोप, दुचाकी चालकांनी केला आहे. दरम्यान, हा प्रकार ‘सीसीटीव्ही’ कॅमे-यात कैद झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.