Pimpri: प्राधिकरणाच्या आशीर्वादाने वाल्हेकरवाडी परिसरातील अनधिकृत रहिवाशी बांधकामांमध्ये वाढ

माहिती अधिकारातून माहिती उघड; घर बचाव संघर्ष समितीचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आहे. सव्वा लाखांपेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे संपूर्ण शहरात उभी आहेत. त्यामध्ये 40 हजारपेक्षा जास्त बांधकामे पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील आहेत, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रहिवाशी बांधकामे होण्यास प्राधिकरण प्रशासनाची मूकसंमती असल्याचे स्पष्ट झाले आहे असा, आरोप घर बचाव संघर्ष समितीने केला आहे.

घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये सदर महत्वाची बाब उघड केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमानुसार मंजूर विकास योजना 10 वर्षात एकदा सुधारीत करावी लागते, असे स्पष्ट मत प्राधिकरणाच्या नगररचनाकारांनी लेखी प्रसिद्धीकरण महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 26 अन्वये जानेवारी 1991 मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यानुसार 1985 नंतर 1995 मध्ये शहर विकास आराखडा बनवला गेला.

त्यानंतर 2005 आणि 2015 मध्ये "मंजूर विकास योजना" सुधारित करणे आवश्यक होते. परंतु 1966 च्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कायद्यास शासनकर्ते आणि राज्यकर्ते यांनी धाब्यावर बसविले आहे. गेल्या 22 वर्षामध्ये मंजूर विकास योजना एकदासुद्धा सुधारित केली नाही. याला जबाबदार असणा-या पालिका आणि प्राधिकरण नगररचना अधिका-यांची चौकशी करावी. प्राधिकरण हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत रहिवाशी घरे होण्यास ही बाब सुद्धा महत्वाची आहे, असे पाटील म्हणाले.

27 वर्षापूर्वी मंजूर विकास योजनेच्या प्रसिद्धीपत्रामध्ये तत्कालीन नगररचनाकार श्री. गो. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे की अनधिकृत बांधकामे 1991 साली सुद्धा मोठ्या प्रमाणात काळेवाडी, रहाटणी, वाल्हेकरवाडी परिसरात होती. त्यानंतरही 2017 पर्यंत ती वाढतच होती. असे होत असताना उपाययोजना न करता त्या बांधकामाना आशीर्वाद देण्याचे काम प्राधिकरण प्रशासनाने केलेले आहे. त्यामुळेच आज या परिसरात 40 हजारापेक्षा जास्त रहिवाशी बांधकामे उभी राहिली. हे आता या पत्रामुळे उघड झाले आहे. प्राधिकरण प्रशासनाने चूक कबूल करावी आणि घरे अधिकृत करण्यासाठी व नियमित करण्यासाठी प्रयत्न करावा, असे विजय पाटील यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.