Pimpri : महापालिका तिजोरीत 151 कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ कराचा भरणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नऊ वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ मालमत्ता कर भरणा सुविधेला शहरवासियांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या एका ‘क्लिक’वर कर भरणा-यांच्या संख्येत दरवर्षी दुपटीने वाढ होत आहे. चालू 2018-19 या आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यात तब्बल एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ऑनलाईन कर भरणा-यांना सामान्य करातील 30 जूनअखेर 5 टक्के, 30 जूननंतर 2 टक्के सवलतीचा लाभ घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाखांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नेहरु पुनरुत्थान अभियानांतर्गंत (जेएनएनयुआरएम) शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल शहराची ओळख बनली आहे. येथील पायाभूत सोयी-सुविधा, महापालिकेने उभारलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांमुळे हा परिसर मालमत्ताधारकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. त्यामुळे दरवर्षाला शेकडो मालमत्तांची भर पडत आहे. पर्यायाने महापालिकेचा मालमत्ताकर भरणा वाढला आहे.

नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात 16 करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे कराचा भरणा करण्याची सुविधा महापालिकेने करुन दिली आहे. याशिवाय महापालिकेने सन 2009-10 मध्ये ‘ऑनलाईन’ कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यानंतर प्रत्येक वर्षी ऑनलाईन कर भरणा-यांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. ऑनलाईन कराचा भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून दिवसें-दिवस ऑनलाईन कर भरणा-यांची संख्या वाढत आहे. 22 नोव्हेंबर 2018 अखेर एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ऑनलाईन कर भरणा-यांना सामान्य करातील 30 जूनअखेर 5 टक्के, 30 जूननंतर 2 टक्के सवलतीचा लाभ घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.