Pimpri: स्थायीच्या दोन जागांसाठी तीन माजी महापौरांसह राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक इच्छुक

एक माजी विरोधी पक्षनेता, एक माजी स्थायी समिती अध्यक्षाही इच्छुक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त होणा-या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 17 नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामध्ये तीन माजी महापौर, एक माजी विरोधी पक्षनेते आणि एक स्थायी समितीच्या माजी अध्यक्षांचा समावेश आहे. 17 नगरसेवकांपैकी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला स्थायीत काम करण्याची संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या 36 नगरसेवकांच्या बलानुसार स्थायी समितीत चार सदस्य आहेत. त्यापैकी गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 29 फेब्रुवारीला संपत आहे. राष्ट्रवादीने स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छुकांडून अर्ज मागविले होते. त्यासाठी 17 इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. भाजपच्या सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा नवीन आठ सदस्यांची उद्या (गुरुवारी) होणा-या महासभेत निवड केली जाणार आहे.

राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे, माजी विरोधी पक्षनेते श्याम लांडे, शीतल काटे, स्वाती काटे, निकिता कदम, सुलक्षणा धर, उषा काळे, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासूळकर, रोहित काटे, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर यांचा समावेश आहे.

दरम्यान, स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आणि दोन नगरसेविका आहेत. त्यातील दोन नगरसेविकांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे दोन नगरसेविकांनाच स्थायीचे सदस्यत्व दिले जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यामधून कोणत्या दोन नगरसेविकांना स्थायीत संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.