Pimpri: 1718 जण ‘होम क्वारंटाईन’, सहा लाख नागरिकांचे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 1718 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, आज अखेर शहरातील 6 लाख 34 हजार 264 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकाला घरी सोडण्यात आले आहे. तर, आज संशयित 26 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 420 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावांचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 369 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज एकुण 26 व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून, त्यांचे कोरोना (कोवीड १९) करीता घशातील द्रावाचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

तीन पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या 244 कर्मचा-यांच्या टीमने शहरातील 6 लाख 34 हजार 264 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आव्हान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

तसेच महापालिकेच्या वतीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा WhatsApp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्णाबाबत माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.