Pimpri: पहिल्या दिवशी पिंपरीसाठी 19, चिंचवडसाठी 9, तर भोसरीसाठी 8 जणांनी नेले अर्ज

पहिल्यादिवशी एकही अर्ज दाखल नाही; निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांची माहिती

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज (शुक्रवारी) प्रसिद्ध झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 19 जणांनी 31 अर्ज, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी 9 जणांनी 15 आणि भोसरीसाठी 8 जणांनी 13 अर्ज नेले आहेत. दरम्यान, तीनही विधानसभा मतदारसंघातून पहिल्यादिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथून होत आहे. पहिल्या दिवशी 19 जणांनी 31 अर्ज नेले असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज वाटप केले जात असल्याचे पिंपरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप आकुर्डीतील पीसीएनटीडीएच्या कार्यालयातील सातव्या मजल्यावरुन होत आहे. चिंचवड विधानसभेसाठी पहिल्या दिवशी 9 जणांनी 15 अर्ज नेले आहेत.

तर, भोसरी विधानसभा मतदारसंघातील अर्जाचे वाटप, स्वीकृती आणि चिन्हांचे वाटप नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील इमारतीमध्ये होत आहे. पहिल्या दिवशी 8 जणांनी 13 अर्ज नेले आहेत. दरम्यान, पहिल्या दिवशी तीनही विधानसभा मतदारसंघातून एकाने देखील उमेदवारी अर्ज भरला नाही.

‘असा’ आहे निवडणूक कार्यक्रम :
निवडणुकीची अधिसूचना – 27 सप्टेंबर 2019
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस – 4 ऑक्टोबर 2019
उमेदवारी अर्जांची छाननी – 5 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – 7 ऑक्टोबर
मतदान – 21 ऑक्टोबर
मतमोजणी – 24 ऑक्टोबर
निवडणूक प्रक्रिया पुर्ण करणे – 27 ऑक्टोबर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.