Pimpri : मुलीच्या जन्माच्या स्वागताप्रित्यर्थ 2 हजार 900 कप मोफत चहा

एमपीसी न्यूज – वंशाला दिवा हवा म्हणून मुलाच्या जन्माचा अट्टहास केला जातो. तर, अनेकदा मुलीच्या जन्मावर अश्रू ढाळले जातात. कायद्याने स्त्री-पुरुष समानता असली तरी मुलीच्या जन्मावेळी बहुतेकदा दु:खच व्यक्त केले जाते. असे असताना पिंपरी-चिंचवडमधील चौगुले कुटुंबियांनी मुलीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला. आपल्या चहा सेंटरमध्ये आलेल्या तब्बल 2 हजार 900 ग्राहकांना चौगुले कुटुंबाने एक कप मोफत चहा वाटून मुलीच्या जन्माबद्दल नागरिकांचे तोंड गोड केले. तसेच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश दिला.

चौगुले दांपत्याला दोन दिवसांपूर्वीच मुलगी झाली. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी आपल्या चहा सेंटरमध्ये आलेल्या ग्राहकांना दिवसभर मोफत चहा देण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. त्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी गुरुवारी रत्ना अमृततुल्य चहा सेंटरमध्ये मोफत चहाचे वाटप करण्यात आले. सकाळी 7 ते रात्री 9 यावेळेत आलेल्या तब्बल 2 हजार 900 ग्राहकांनी या मोफत चहाचा आस्वाद घेतला.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि समाजात वेगळा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे चौगुले कुटुंबीयांनी सांगितले. चौगुले कुटुंबियांनी अनोख्या पद्धतीने मुलीचे स्वागत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.