Pimpri : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून वर्षभरात 21 लाखाचा दंड वसूल

17 हजार किलो प्लॅस्टिक तर 461 किलो थर्माकोल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या वर्षभरात प्लॅस्टिक वापरणा-या 486 दुकानदारांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 21 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. तर, 17 हजार 764 किलो प्लॅस्टिक, आणि 461 किलो थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ‘ब’ प्रभागातून 5 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, सर्वात कमी ‘ड’ प्रभागात 95 हजार रुपये दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.

पर्यावरणाचा ऱ्हास करणा-या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर सरकारने वर्षभरापूर्वी बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती.

महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई केली जात आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2019 या कालावधीत 486 दुकाने, आस्थापनांची तपासणी करण्यात आली. प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांकडून 21 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर, सुमारे दहा हजार 17 हजार 764 किलो प्लास्टिक तर 461 किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे.

त्यामध्ये ‘अ’ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत 76 दुकानांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 7 हजार 730 किलो प्लॅस्टिक आणि 408 किलो थर्माकॉल जप्त करत 3 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘ब’ कार्यालयातील 106 दुकांनाची तपासणी करत 6 हजार 25 किलो प्लॅस्टिक आणि 11 किलो थर्माकॉल जप्त केले. त्यांच्याकडून 5 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘क’ प्रभागातील 114 दुकानांची तपासणी केली. त्यांच्याकडून 1 हजार 457 प्लॅस्टिक आणि 2 किलो थर्माकॉल जप्त करत 2 लाख 25 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘ड’ प्रभागातील 18 दुकानांची तपासणी केली. त्यांच्याकडून 1 हजार 51 किलो प्लॅस्टिक आणि 20 किलो थर्माकॉल जप्त करत 95 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

‘इ’ प्रभागातील 33 दुकानांची तपासणी करत 285 किलो प्लॅस्टिक जप्त केले. त्यांच्याकडून 1 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ‘फ’ प्रभागातील 45 दुकानांची तपासणी केली. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ‘ग’ प्रभागातील 64 दुकानांची तपासणी केली. त्यांच्याकडून 995 किलो प्लॅस्टिक आणि 15 किलो थर्माकॉल जप्त करत 3 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, ‘ह’ प्रभागातील 30 दुकानांची तपासणी करत 221 किलो प्लॅस्टिक आणि 5 किलो थर्माकॉल जप्त केले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. असे एकूण आठही प्रभागातील 486 दुकानांची तपासणी करत 17 हजार 764 किलो प्लॅस्टिक आणि 461 किलो थर्माकॉल जप्त केले आहे. त्यांच्याकडून 21 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

याबाबत बोलताना आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पथकामार्फत प्लास्टिक व थर्माकोल वापरणा-यांची तपासणी करण्यात येत आहे. प्लास्टिक वापरणा-यांवर पुन्हा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. नागरिकांनी प्लास्टिक, थर्माकॉलचा वापर टाळावा. प्लास्टिक व थर्माकॉल आढळल्यास संबंधिताविरुध्द नियमानुसार दंड व गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.