Pimpri: दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या 33 पैकी 23 जण सापडले; 10 जण शहराबाहेरचे

प्राथमिक तपासणीत कोरोनाची लक्षणे नाहीत

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील मर्कझमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 33 पैकी 23 नागरिकांचा महापालिकेने शोध घेतला आहे. तर, 10 जण संबंधित पत्त्यावर वास्तव्याला नाहीत. त्यामुळे दिल्लीतून शहरात 23 जणच आले असल्याचे समोर आले आहे. त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्या प्राथमिक तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. या कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभर खळबळ उडाली.

दरम्यान, या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 33 नागरिक सहभागी झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी मंगळवारी 14 जणांचा शोध घेतला होता. त्यानंतर उर्वरित नागरिकांचा शोध घेत असताना केवळ नऊच नागरिक शहरात मिळून आले. दहा नागरिक त्या पत्यावर वास्तव्याला नाहीत. ते शहर सोडून गेले आहेत. त्यामुळे दिल्लीतून शहरात आलेल्या नागरिकांची संख्या 23 असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या 23 नागरिकांना महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यापैकी 14 जणांचे आज बुधवारीच नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.