Pimpri: ‘स्वच्छ भारत अभियान’च्या जनजागृतीवर 25 लाखांची उधळपट्टी; थेट पद्धतीने दिले काम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा विरोध; प्रस्तावाला स्थायी समितीने दिली मान्यता

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘स्वच्छ भारत अभियान 2020’ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणाच्या जनजागृतीवर पिंपरी-चिंचवड महापालिका 25 लाख रुपयांची उधळपट्टी करणार आहे. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने जनजागृतीचे काम सुरज एॅडव्हरटायजिंग या खासगी एजन्सीला दिले आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (शुक्रवारी) मान्यता दिली. दरम्यान, थेट पद्धतीने काम देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला.

शहराची लोकसंख्या सुमारे 22 लाख एवढी आहे. केंद्र सरकारतर्फे 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. देशभरात स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत असून ‘स्वच्छ भारत अभियान 2020’ राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार केला जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचे सर्व क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत स्वच्छता जागृती विषयक घोषवाक्ये, चित्रे, भिंतीवर रंगवून घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फेत दरवर्षी आरोग्य विषयक योजना, वैद्यकीय, आरोग्य, पर्यावरणविषयक जागृती तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणीसासाठी महत्वाचे चौक, शासकीय इमारती, विविध गृहरचना संस्था यांच्या सिमाभिंती यावर वॉल साईन बोर्डाचे (भिंत रंगविणे)कामकाज केले जाते.

त्याअनुषंगाने वैद्यकीय विभागामार्फत निश्चित केलेल्या दरानुसार स्वच्छ भारत अभियान जनजागृतीचे काम कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेटपद्धतीने सुरज एॅडव्हरटायजिंग या खासगी एजन्सीकडून करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांना 25 लाख रुपये दिले जाणार आहेत. ‘आरोग्य विषयक शासकीय योजनांची अंमलबजावणी व आरोग्य विषयक जनजागृती’ या लेखाशिर्षावरील उपलब्ध तरतूदीतून हा खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.