Pimpri : पवना धरणातील पाणीसाठा 25 टक्‍क्‍यांवर

एमपीसी न्यूज – कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे आणि पाण्याच्या होणा-या अतिवापरामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. आजमितीला धरणात 24.98 टक्के पाणीसाठा असून 30 जूनपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा धरण शंभर टक्के भरले. परंतु, परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने लवकरच धरणातून पाणी उपसा करण्याची वेळ आली. त्यातच तापमानाचा पारा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच वाढता राहिला. त्यामुळे मोठ्‌या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. पवना धरणात आजमितीला 24.98 टक्के पाणीसाठा असून हा साठा गतवर्षीपेक्षा 8 टक्के कमी आहे. हा पाणीसाठा 30 जूनपर्यंत पुरेल एवढा मर्यादित आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 33 टक्के पाणीसाठा होता.

पाणीसाठ्यात कमालीची घट झाली. पाटबंधारे खात्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी उपसा कमी करण्याच्या सूचना केल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत नागरिकांचा रोष ओढवून घ्यावा लागू नये यासाठी अवघी दहा टक्‍के पाणी कपात केली. पाणी कपात वाढविण्याच्या पाटबंधारे खात्याने वेळोवेळी सूचना करुनही पाणी कपात लांबणीवर टाकण्यात आली. अधिकचा उपसा सुरूच राहिल्याने धरणातील पाणी पातळी अधिकच खालावत चालली.

अखेर लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच पाणीकपात सुरु केली. शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. धरणात 30 जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास अथवा संथगतीने पावसाची सुरूवात झाल्यास पाणी साठ्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे जुलैच्या मध्यापर्यंत पाणीसाठा टिकवून ठेवण्याचे आव्हान पाटबंधारे खात्यासमोर आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 24.98 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीपेक्षा 8 टक्के हा पाणीसाठा कमी आहे. 30 जूनपर्यंत पुरेल एवढाच मर्यादित साठा आहे. पिंपरी महापालिकेने पाणी कपात सुरु केला आहे. एकदिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याने धरणातील पाणीसाठ्यात बचत होत आहे. त्यामुळे धरणातील पाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरु शकते”.

यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरा

यंदा मान्सून केरळ किनारपट्टीवर 6 जूनपर्यंत धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सामान्यतः तो मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये दाखल होतो. परंतु, यंदा तो केरळमध्येच चार ते पाच दिवस उशिरा येत असल्याने पुढे त्याला महाराष्ट्रामध्ये पोहोचायला आणखी वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची काटकसरीने वापर करावा लागेल. अन्यथा पिंपरी-चिंचवडकरांना गंभीर पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.