Pimpri: …अबब श्वानसंततीवर तीन वर्षात तब्बल तीन कोटींचा खर्च! 

43 हजार 296 श्वानांनवर शस्त्रक्रिया

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षात 43 हजार 296 श्‍वानांवर संतती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याकरिता तब्बल तीन कोटी पाच लाख 754 रुपये खर्च झाला आहे. वर्षाला श्वान संततीवर महापालिकेने एक कोटी रुपये खर्च केला आहे. तर, दर महिन्याला 850 जणांचा श्‍वान चावा घेत असल्याची बाब समोर आली आहे.

महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाच्या वतीने भटक्‍या व बेवारस कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार व ऍनिमल वेल्फेअर बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी संस्थांमार्फत श्‍वान संतती नियमन शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत मुंबईच्या ए.डब्ल्यू.ए. आणि लातूरच्या एस.पी.सी.ए. या दोन संस्थांना शस्त्रक्रियेचा ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक श्‍वान शस्त्रक्रियेसाठी महापालिका 639 रुपये मोजत आहे. आतापर्यंत शहरातील 43 हजार 296 श्‍वानांवर शस्त्रक्रिया करूनही त्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही.

या दोन्ही संस्थांच्या वतने दररोज 30 ते 35 कुत्री पकडून त्यांची संतती नियमनाची शस्त्रक्रिया केली जात असून, तीन दिवस त्या कुत्र्यांना देखरेखीखाली ठेवले जाते. तीन दिवसांनंतर या कुत्र्यांना पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. शहराच्या विविध भागांमधील कचराकुंड्यांच्या ठिकाणी कुत्र्यांच्या झूंडी नागरिकांची डोकेदुखी ठरली आहे. महिनाभरात सुमारे 850 नागरिकांना ही कुत्री चावा घेत आहेत.

सन 2015-16 मध्ये श्वान संततीसाठी दीड कोटी 693 रुपये तरतूद ठेवली होती. त्यापैकी एक कोटी 9 लाख 55 हजार 523 रुपये खर्चून 15 हजार 808 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सन 2016-17 मध्ये तीन कोटी 693 रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 87 लाख 19 हजार  315 रुपये खर्चून 12 हजार 581 श्वानांवर  शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सन 2017-18 मध्ये श्वान संततीसाठी तीन कोटी 693 रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी एक कोटी तीन लाख 30 हजार 916 रुपये खर्चून 14 हजार 907 श्वानांवर  शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एकूण तीन वर्षात श्वान संततीसाठी साडे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी तीन कोटी पाच लाख 754 रुपये खर्चून 43 हजार 296 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील भटकी कुत्री पकडण्याचा ठेका दोन संस्थांना देण्यात आला आहे. तर डुकरांची संख्यादेखील वाढत असताना, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या वतीने निविदा प्रसिद्ध करण्याचे काम अति टप्प्यात आले आहे. ही निविदा अंतिम झाल्यानंतर शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याचे काम हाती गेतले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.