Pimpri: तीन लाख बालकांना दिली गोवर-रुबेला प्रतिबंधक लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे तीन लाख 21 हजार 486 बालकांनी सोमवारपर्यंत (दि.17) गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच अद्यापही ज्यांनी लसीकरण केले नाही. त्यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये 1018 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याअंतर्गत शहरातील तीन लाख 21 हजार 486 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे आणि महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले.

शालाबाह्य बालके आणि ज्या बालकांना अद्यापही गोवर-रुबेला लसीकरण झाले नाही. अशा बालकांसाठी बाह्य संपर्क लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी पालकांनी बालकांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.