Pimpri Crime News : पिंपरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर 33 लाख 55 हजारांची घरफोडी

घराच्या बाथरूममध्ये लपलेली तीन मुले पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या टेरेसवरून फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उतरून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी, पितळीची भांडी, कॉम्पुटर पार्ट, लॅपटॉप कॉम्पुटर मिडिया लायसन्सचे सॉफ्टवेअर, घरगुती वापराच्या वस्तू, कपडे, शेअर्सचे सर्टिफिकेट आणि डायमंड रिंग असा तब्बल 33 लाख 55 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना आज (गुरुवारी, दि. 28) दुपारी सव्वा बारा वाजता एम बी क्लासिक, चिंचवड स्टेशन येथे उघडकीस आली.

लखपतराज संपतराज मेहता (वय 54, रा. नरीमन पॉइंट, मुंबई. मूळ रा. एम बी क्लासिक, चिंचवड स्टेशन, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहता हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वॉईस मॅगेझीन नावाचे मुंबई येथे साप्ताहिक आहे. मेहता यांचे चिंचवड स्टेशन येथील घर कुलूप लावून बंद असते. पुण्यात आल्यानंतर ते आपल्या चिंचवड स्टेशन येथील घरी राहतात. डिसेंबर महिन्यात त्यांनी चिंचवड स्टेशन येथील घरी भेट दिली. त्यानंतर ते 28 जानेवारी रोजी पुन्हा कामानिमित्त पुण्यात आले.

सकाळी साडेअकरा वाजता मेहता यांची पत्नी आणि मुलगा चिंचवड स्टेशन येथील घरी गेले. तर मेहता हे मामुर्डी येथे कामानिमित्त गेले. दुपारी सव्वा बारा वाजता त्यांच्या पत्नीने फोन करून त्यांच्या घरात चोर शिरले असल्याची माहिती दिली. मेहता यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि घराकडे धाव घेतली.

मेहता यांच्या संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. तर तीन अल्पवयीन मुले त्यांच्या हॉलच्या बाथरूममध्ये लपून बसली होती. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले.

चोरट्यांनी मेहता यांच्या घरातून 10 लाख रुपयांचे कंदिरा सोने व सोन्याची चेन, 60 हजार रोख रक्कम, 2 लाख 75 हजारांचे वेगवेगळ्या कॉम्पुटरच्या अॅक्सेसरीज, 3 लाख 80 हजारांची पाच किलो चांदीची भांडी, 50 हजारांचे दोन आयबीएम कंपनीचे लॅपटॉप, 40 हजारांची पाच किलो पितळेची भांडी, 3 लाख रुपयांचे वेगवेगळी कॉम्पुटर मिडिया लायसन्सचे सॉफ्टवेअर चार सीडी, 7 लाख रुपयांच्या घरगुती वापराच्या वस्तू आणि कपडे, 3 लाखांचे शेअर्स सर्टिफिकेट असलेली फाईल आणि 5 लाख 50 हजारांची डायमंड रिंग असा एकूण 33 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

चोरट्यांनी सोसायटीच्या टेरेसवरून घराच्या गॅलरीत प्रवेश केला. तिथून त्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त टाकून घरफोडी केली. हा सर्व प्रकार पिंपरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी मेहता यांच्या पत्नी आणि मुलगा घरी आले असता चोरटे घराच्या बाथरूममध्ये लपून बसल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत आणखी काही साथीदार आहेत का, याबाबत पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.