Pimpri: दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, दीड लाखाच्या चार दुचाकी पळविल्या

घर, कार्यालयांसमोरून, सार्वजनिक रस्त्यावरून वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे. यात सातत्याने वाढ होत आहे. वाहन चोरटे सुसाट असल्याने घर, कार्यालयांसमोरुन, सार्वजनिक रस्त्यावरून दुचाकी चोरीला जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून एक लाख 40 हजाराच्या चार दुचाकींची चोरी झाली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये शुक्रवारी (दि. 6) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरीची पहिली घटना  नाशिक फाटा येथे 28 फेब्रुवारी रोजी घडला. याप्रकरणी चेतन नानाराव देशमुख (वय 26, रा. लोहगाव, पुणे, मूळगाव मु. उमरा, पो. लोनी गवळी, ता. मेहकर, जि. बुलढाणा) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चेतन याने त्याची दुचाकी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली सार्वजनिक जागी रस्त्याच्या कडेला दुपारी दीड वाजता लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 40 हजारांची ती दुचाकी चोरून नेली. चेतन देशमुख रात्री साडेबाराच्या सुमारास तेथे आले असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना डांगे चौक, वाकड येथे 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी दिनकर एकनाथ केंजळे (वय 48, रा. जुनी सांगवी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. केंजळे  यांनी त्यांची दुचाकी डांगे चौकात लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांची दुचाकी भरदिवसा चोरून नेली.

दुचाकी चोरीची तिसरी घटना काळेवाडी येथे मंगळवारी (दि. 3) रात्री पावणेबारा ते बुधवारी (दि. 4) सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सावन नरसुमल तोतानी (वय 45, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावन तोतानी यांनी त्यांची दुचाकी घरासमोर लॉक करून पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी 50  हजारांची ही दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची चौथी घटना  मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे गुरुवारी (दि. 5) सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी अभिजित प्रभाकर जरे (वय 34, रा. बाणेर, पुणे, मूळगाव बेलापूर रोड, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजीत जरे यांनी त्यांची दुचाकी बाणेर येथे एका कंपनीच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने 20 हजारांची ही दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.