Pimpri: महापालिका पाणीपुरवठ्यासाठी उभारणार 400 कोटींचे कर्जरोखे!

सल्लागार संस्थेची नेमणूक करणार -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा योजना सक्षमपणे राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका 400 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारणार आहे. या कामासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. महापालिकेचे ‘एए’ पतमानांकन असून केंद्र सरकारच्या परवानगीने कर्जरोख्यासंदर्भात पाऊले उचलली जाणार असल्याचे सांगितले.

पाणी पुरवठ्याच्या विविध कामांसाठी महापालिकेला सुमारे 600 कोटी रूपयांची आवश्यकता आहे. मात्र पाणीपुरवठा विभागाला पाणीपट्टी वसूलीतून केवळ वर्षाकाठी 75 कोटींचे उत्पन्न मिळते. पाणीपट्टीत दरवाढ गृहित धरल्यास ही वसूली 150 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे उर्वरित 400 कोटींसाठी कर्जरोखे उभारणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एए एए पतमानांकन आहे. त्यामुळे कर्जरोखे उभारण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असे आयुक्त हर्डीकर म्हणाले.

बाजारातील सद्यस्थितीनुसार आपण सल्लागार संस्थेच्या माध्यमातून कर्जरोखे उभारणार आहोत. महापालिकेला कर्जरोखे उभारण्यासाठीची पूर्वतयारी करून देणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत शेअर बाजाराचा संपूर्ण सर्व्हे, महापालिकेची आर्थिक पत, कर्जरोखे उभारण्याची संपूर्ण माहिती, आवश्यक परवानगी या गोष्टी सल्लागार संस्था आपल्याला करून देईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.