Pimpri: दिलासादायक! 414 जणांचा 28 दिवसांचा ‘क्वारंटाईन’ कालावधी संपला, कोरोनाची लक्षणे नाहीत

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू परदेशातून आला आहे. कोरोनाची लागण परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे परदेशातून शहरात आलेले, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील अशा दोन हजार 48 नागरिकांना आजपर्यंत ‘क्वारंटाईन’ केले होते. त्यातील 414 जणांचा 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. जरी लक्षणे असली तरी त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. दोनवेळा तपासणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला आहे.

जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने भारतात देखील चांगलाच शिरकाव केला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामध्ये कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी आला होता. त्यानंतर पुण्यामध्ये रुग्ण सापडले. आता राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. त्याखालोखाल पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा क्रमांक येतो.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर महापालिकेने परदेशातून आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील, निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली होती. आजपर्यंत दोन हजार 48 नागरिकांना  ‘क्वारंटाईन’ केले आहे. त्यातील 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण झालेल्यांना मोकळे केले जणार आहे. यापूर्वी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी होता. परंतु, 21 दिवसानंतरही लक्षणे येताना दिसून आली. त्यामुळे क्वारंटाईनचा कालावधी वाढवून 28 दिवसांचा केला आहे.

त्यातील 414 जणांचा 28 दिवसांचा ‘क्वारंटाईन’ कालावधी संपला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे असली तरी त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. अशी ही सर्व लोक आहेत. यातील ब-यापैकी नागरिक परदेशातून आले आहेत.  तर, काही जण ‘हाय’ आणि ‘लो रिस्क’ कॉन्टॅक्टमधील होते. ते निगेटीव्ह आले असले तरी देखील त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे 28 दिवस पूर्ण झाले आहेत. हे सर्वजण घरीच होते. लॉकडाऊन  असल्याने त्यांना घरीच राहावे लागणार आहे. परंतु, त्यांच्यावर होम क्वारंटाईनची आवश्यकता नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत 35 कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये पहिले पॉझिटीव्ह आलेले 12 रुग्ण परदेशवारी करुन किंवा त्यांच्या हाय संपर्कात आलेले होते. त्यानंतर दिल्ली येथे तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्यांच्या संपर्कातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. आता तबलीगीच्या संपर्कात आलेले रुग्ण पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच पुण्यामधील रुग्णांच्या संपर्कात आलेले देखील पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे मागील पाच दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले की, ”पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. तेव्हापासून परदेशातून शहरात आलेले नागरिक, त्यांच्या कॉन्टॅक्टमधील नागरिकांना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली होती. आजपर्यंत दोन हजार 48 नागरिक क्वारंटाईन झाले आहेत. क्वारंटाईन नागरिकांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत आहे”.

आजपर्यंत 35 जणांना कोरोनाची लागण, 12 जण कोरोनामुक्त

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 35  जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 22 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 19 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.12) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.