Pimpri : साडेचारशे विद्यार्थ्यांनी सलग 18 तास वाचले शिवचरित्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात 450 विद्यार्थ्यांनी सलग 18 तास शिवचरित्र वाचन केले. पिंपरी-चिंचवडसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, नाशिक, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पराक्रमातून प्रेरणा मिळते. त्यांचे जीवन हे प्रेरणादायी आहे, त्यांच्या चरित्राच्या वाचनातून नवी पिढी घडेल. तसेच सलग 18 तास शिवचरित्र वाचनातून वाचन संस्कृती अधिक वृद्धींगत होईल. असे उपक्रम व्हायला हवेत. कोणतेही ध्येय छोटे नसते, थॉमस एडीसन यांनी 95 प्रयोग केल्यानंतर ते हसत बाहेर आले. तेव्हा त्यांचे सहकारी त्यांना हसत होते. पण त्यांच्यामध्ये एक नवीन उमेद निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सातत्याने कार्यमग्न असले पाहिजे” असे आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “छत्रपती शिवरायांच्या जिवनात अनेक बिकट प्रसंग आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या अंगी असलेले कौशल्य, त्यांच्या साथीदारांमध्ये असलेले शौर्य, पराक्रम,प्रामाणिकपणा व मातोश्री राजमाता जिजाऊ व गुरुजनांकडून मिळालेले मार्गदर्शन व आशीर्वाद यामुळे लोककल्याणकारी व सर्वसमावेशक स्वराज्य निर्माण करता आले. अत्यंत लहान वयात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संकल्प सोडला. शिवरायांच्या अंगी असलेले कौशल्य व पराक्रमातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले उचित ध्येय गाठावे”

या उपक्रमातील सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी ध्यानसाधना, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, लघुपट अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे, बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा इंगवले उपस्थित होते.

वाचन, लेखन व वक्तृत्व हा या उपक्रमाचा एक भाग म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. संजय नगरकर, डॉ. सोमीनाथ दडस यांनी काम केले. ही स्पर्धा “शिवाजी द मॅनेजमेंट गुरु” या प्रा. नामदेवराव जाधव यांच्या पुस्तकावर घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक भागवत तालिकोट (बाबुरावजी घोलप महाविद्याल सांगवी पुणे), द्वितीय क्रमांक किरण लोंढे (सिटी बोरा कॉलेज शिरुर), तृतीय क्रमांक संगमित्रा सुंदर तायड (श्री म्हाळसाकांत हायस्कूल आकुर्डी) व उत्तेजनार्थ दोन क्रमांक शरणागत यशोदिप (श्री म्हाळसाकांत हायस्कूल आकुर्डी) व विजय खोले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज औंध) यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदा राशिनकर यांनी केले तर आभार प्रा. सुवर्णा खोडदे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.