Pimpri : आयत्यावेळी 48 सल्लागारांची नियुक्ती, फुटकळ कामासांठीही सल्लागार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत किरकोळ कामांनाही सल्लागार नेमले जात आहेत. सल्लागारांचे पेव फुटले आहे. सल्लागार नियुक्तीवरुन टीका होत असतानाही सत्ताधा-यांनी सल्लागारांची नियुक्ती करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. स्थायी समितीच्या गुरुवारी (दि. 22) झालेल्या सभेत तब्बल 57 कामांसाठी सल्लागारांची नेमणूक केली. विषयपत्रिकेवरील नऊ कामांसाठी सल्लागार नेमणुकीशिवाय आयत्यावेळच्या प्रस्तावाद्वारे 48 सल्लागारांची नियुक्ती केली आहे. “तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधकांनी सल्लागार नेमणुकीचे प्रस्ताव मंजूर करुन घेतले.

प्रशासनाकडून विषय पत्रिकेवर नऊ सल्लागार नेमणुकीचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्याला मंजुरी देतानाच आयत्यावेळी प्रशासन आणि सदस्य अशा दोघांनी मांडलेल्या तब्बल 48 कामांसाठी सल्लागार नेमणुकीला मंजुरी देण्यात आली. यामध्ये महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबरोबरच ग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 22 तर ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 23 कामे तसेच वाकड ते दत्त मंदिर रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यासाठी सल्लागार नेमणुकीला मंजुरी देण्यात आली.

मोशीतील मोरया कॉलनी फातिमा नगर, खानदेशनगर, संत ज्ञानेश्‍वर नगर याठिकाणचे रस्ते विकसित करण्यासाठी तसेच ह क्षेत्रीय स्थापत्य विभागांतर्गत मुळा नदी पात्रालगत 12 मीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी, माकन चौक ते शुद्धीकरण केंद्र ते वसंतदादा पाटील पुतळा व परिसरातील रस्ते विकसित करणे, सांगवी परिसरातील मुख्य रस्ते विकसित करण्यासाठी मेसर्स इन्फिनिटी कन्सल्टींग इंजिनिअर्स यांची व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुणे-मुंबई द्रूतगती मार्ग विकास आराखड्यानुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामांतर्गत वाकड ते मुकाई चौक तसेच सेवा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी इन्फ्राकिंग कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा. लि. यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 11 मधील घरकुल चौकामध्ये स्पाईन रस्त्यावर रस्ता ग्रेडसेपरेटर तयार करणे व स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्‍स चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी सी. व्ही. कांड, म्हेत्रेवस्तीतील शाळा इमारत विस्तारीकरण व प्राधिकरणाकडून हस्तांतरीत झालेल्या मोकळ्या जागेवर व्यायामशाळा बांधण्यासाठी मनस्वी आर्किटेक्‍ट, फ प्रभागात ठिकठिकाणी सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी शिल्पी आर्किटेक्‍ट ऍण्ड प्लॅनर्स यांना सल्लागार म्हणून नेमण्यास स्थायी समितीने विनाचर्चा मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.