Pimpri : सृष्टिमार्ग संस्थेचा वर्धापनदिन साजरा

एमपीसी न्यूज- सृष्टिमार्ग संस्थेच्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (दि. 23) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी स्वरझंकार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामधून मिळालेला निधी स्नेहवन या संस्थेला देणगी स्वरूपात देण्यात आला.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना पायल गोखले यांनी त्यांच्या पदलालित्याने सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना उमेश पुरोहित (संवादिनी), विवेक भालेराव (तबला), मानसी भागवत आणि अंकिता तांबे(गायन) यांची उत्तम साथ मिळाली.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पं. रोनु मुझुमदार यांच्या बासरीवादनाने श्रोते तल्लीन झाले. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला) आणि कल्पेश (बासरी) यांच्या साथीने कार्यक्रमाची उंची वाढवली. नागस्वरावली नावाच्या जन्य रागापासून सुरुवात करून ठुमक चलत रामचंद्र तसेच माझे माहेर पंढरी या गाण्यांनी रसिकांना भारावून टाकले.

कार्यक्रमाला ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख वा.ना. अभ्यंकर, नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे, निगडी कृष्णमंदिराचे कुट्टी, स्नेहवर्धन संस्थेचे अशोक देशमाने, योगप्रशिक्षक उजगांवकर, क्रिस्टल इंडस्टीजचे अमोल शिंदे, प्रसाद पेटारे यांच्याबरोबर सृष्टिमार्ग संस्थेच्या चिंचवड आणि बावधन शाखेचे सदस्य, देणगीदार उपस्थित होते.

सूत्रसंचालन कल्याणी कुलकर्णी यांनी केले तर संस्थेचा परिचय दत्तात्रय जोशी यांनी करून दिला. आभार उल्हास पुराणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत दामले, योगेश महाशब्दे, तुषार पुराणकर, शुभांगी महाशब्दे, शरयू पुराणकर, विनीत कुलकर्णी, स्मृती पुराणिक यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थापक अध्यक्ष अरुण पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.