Pimpri: गर्दीच्या नियंत्रणासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्यापासून ’50-50′ फॉर्म्युला

महापालिका कार्यालयांत आळीपाळीने काम

एमपीसी न्यूज – कोरोनाचा संसर्ग होवू नये, गर्दी नियंत्रणात असावी यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत उद्या (शुक्रवार) पासून 50 टक्केच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असतील. 31 मार्चपर्यंत आळीपाळीने कर्मचाऱ्यांनी महापालिकेत उपस्थित रहावे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत. आवश्यकता भासल्यास या कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील. दरम्यान, वैद्यकीय, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

कोरोना विषाणूचा पिंपरी-चिंचवडमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 11 आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येणे टाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक वाचनालये, अभ्यासिका, महापालिका मुख्यालयात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

त्यापार्श्वभूमीवर तातडीचे, महत्वाचे काम चालू राहण्यासाठी विभागप्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी यांना दररोज कार्यालयात बोलवू नये. त्याऐवजी आळीपाळीने कार्यालयात बोलवावे. कार्यालयीन कामकाजाचे आवश्यकतेनुसार रजा मंजूर कराव्यात. यामुळे कार्यालयातील वाहतूक व्यवस्थेतील अनावश्यक गर्दी कमी होऊ शकेल. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या किमान 50 टक्के राहील याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी. याप्रकारे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात अनुपस्थित राहण्याकरिता रजा मिळेल. त्यांनी त्यांची प्रलंबित कामे कार्यालयातील उपस्थितीच्या दिवशी पूर्ण करावीत.

आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छिणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तातडीने रजा मंजूर करावी. वैद्यकीय प्रमापत्र सादर न करता परिवर्तित रजासुद्धा संबंधितांना मंजूर करण्यास हरकत नाही. विभागप्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करुन घ्यावेत. त्याच्या नोंदी ठेवाव्यात. कार्यालयास ज्या वेळेस कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. त्यावेळेस संपर्क साधल्यानंतर ते उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. सूचना प्राप्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेकरिता प्रशासन, वैद्यकीय, आरोग्य विभाग, इतर विभागप्रमुखांमार्फत ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांसह महापालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवेतील विभाग, आपत्कालीन विभाग, कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते. त्यामुळे या कार्यालयांना हा आदेश लागू नाही. या विभागातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणांशिवाय देय असलेल्या रजा देय राहणार नाही.

नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्याचे काम सोपविलेल्या विभागप्रमुखांनी विभागातील सेवा पुरविण्याच्या कामकाजामध्ये कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी राहणार नाहीत. याची खबरदारी घेवून आवश्यक त्या प्रमाणतच रजा मंजूर करण्याबाबत खबरदारी घ्यावी असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.