Pimpri: पवना धरणात मार्चअखेर 57 टक्के पाणीसाठा,  जुलैपर्यंत पुरणार पाणी

मागीलवर्षीपेक्षा 16 टक्के अधिकचा साठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 57.32 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा साठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत 16  टक्के अधिकचा पाणीसाठा असून  गतवर्षीच्या आजच्या तारखेला 41.83 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, यंदा महापालिकेने हिवाळ्यापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात शहरवासीयांना अधिकच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा मार्चअखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा धरण 100 टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात चार हजार 20 मिली मीटर पावसाची नोंद झाली. गेल्यावर्षी तीन हजार 367  मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा 700 मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. मार्चअखेरला देखील धरणात 57.32 टक्के पाणीसाठा आहे.

पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होता असल्याने समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने 25  नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. 25 जानेवारी 2020 पर्यंत ही पाणीकपात असणार होती. पंरतु, महापालिका प्रशानाने अनिश्चित काळासाठी कपात पुढे कायम ठेवली.  पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी आणखीन 30 एमएलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे. जादा लागणारे 30 एमएलडी पाणी उपलब्ध झाले नसल्याचे सांगत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला. तसेच एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. पाण्याच्या तक्रारींच्या संख्येत देखील घट झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहरअभियंता मकरंद निकम म्हणाले, ”पवना धरणात आजमितीला 57.32 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. महापालिका दिवसाला 480 ते 490 एमएलडी पाणी उचलते. त्यामुळे एकदिवसाआड पाणीपुरवठा असला तरी नागरिकांच्या तक्रारी कमी आहेत. नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. ज्या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल. त्या भागाला  टँकरद्वारे पाणी दिले जाते”.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले,  ‘धरणात आजमितीला 57.32 टक्के पाणीसाठा आहे. 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 41.83 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा 16 टक्के जादा पाणीसाठा धरणात आहे. परंतु, महापालिका, एमआयडीसी, तळेगावसाठी धरणातून दिवसाला 900 एमएलडी पाणी उचलले जाते.  पुढील काळात पाणी टंचाईला सामोरे जावू लागू नये यासाठी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like