Pimpri : पिंपरीसाठी असणार 798 बॅलेट युनिट; तीन लाख 53 हजार 545 मतदार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी 399 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तीन लाख 53 हजार 545 मतदार आपला मतदाना हक्क बजावू शकणार आहेत. पिंपरी विधानसभेसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एका यंत्रावर 15 उमेदवार आणि ‘नोटा’चा पर्याय देणे शक्य आहे. जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक केंद्रावर दोन मतदान यंत्र (बॅलेट युनिट) वापरावी लागणार आहेत. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिट असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मतदान साहित्याचे आज (रविवारी) वाटप करण्यात आले आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात एक लाख 67 हजार 600 महिला तर एक लाख 85 हजार 939 पुरुष आणि सहा अन्य असे तीन लाख 53 हजार 545 मतदार आहेत. 399 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी 19 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर केली आहेत. मतदान केंद्र क्रमाकं 204 हे पिंपरीगावातील केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडले आहे. या केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असणार आहेत. 53 मतदान केंद्राचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

प्रत्येक मतदान केंद्रासाठी असणाऱ्या ईव्हीएममध्ये 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट असणार आहे. त्याशिवाय, प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहे. पहिल्या बॅलेट युनिटवर 1 ते 16 उमेदवारांची नावे असतील. दुसऱ्या बॅलेट युनिटवर सतराव्या आणि अठराव्या उमेदवाराचे नाव आणि 19 क्रमांकाला नोटाचे (नकाराधिकार) बटण असणार आहे. एकूण 399 मतदान केंद्रांसाठी 798 बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर, 80 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात येणार आहेत.

मतदान केंद्रांसाठी एकूण 20 टक्के राखीव ईव्हीएम सहित एकूण 479 ईव्हीएम आहेत. 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट याची जोडणी करुन या मशीन मतदानासाठी तयार करण्यात येतात. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 2200 कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहेत.

‘हे’ 18 उमेदवार नशीब आजमावत आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे अण्णा बनसोडे ‘घड्याळ’, शिवसेना-भाजप महायुतीचे गौतम चाबुकस्वार ‘धनुष्यबाण’, बहुजन समाज पार्टीचे धनराज गायकवाड ‘हत्ती’, बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद हेरोडे ‘खाट’, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण गायकवाड ‘गॅस सिलेंडर’, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदीप कांबळे ‘ब्रेड’, अपक्ष अजय गायकवाड ‘हिरा’, अजय लोंढे ‘शिट्टी’, मुकुंदा ओव्हाळ ‘फुटबॉल’, चंद्रकांत माने ‘पेनाची नीब सात किरणांसह’, दीपक जगताप ‘शिवणयंत्र’, दीपक ताटे ‘रोड रोलर’, नरेश लोट ‘सफरचंद’, बाळासाहेब ओव्हाळ ‘अंगठी’, मीना यादव ‘प्रेशर कुकर’, युवराज दाखले ‘ऑटो रिक्षा’, डॉ. राजेश नागोसे ‘कोट’ आणि हेमंत मोरे यांना ‘कपबशी चिन्ह’ हे पिंपरीतील उमेदवार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.